पत्रकार भवनाची सुरुवात व शेवट शिवसेना आमदार असताना होतो याचा आनंद – खा.जाधव

238

संजय निकाळजे
बुलढाणा (BNU न्यूज) बुलढाणा येथील पत्रकार भवनाच्या कामाची सुरूवात शिवसेनेचा आमदार असताना झाली आणि शेवटही शिवसेना आमदार असताना होत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन खा.प्रतापराव जाधव यांनी केले. बुलडाणा येथील जिल्हा पत्रकार भवनाच्या शब्दपूर्ती सोहळा व 50 लक्ष रुपयाच्या विस्तारीत बांधकामाचे भूमिपूजन रविवार २ ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी खा.जाधव बोलत होते.

या कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक संदीप काळे, आमदार संजय गायकवाड, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशजी पोहरे, युवा नेते मृत्युंजय गायकवाड, संदीप गायकवाड यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, न.पा.मुख्याधिकार गणेश पांडे, कुणाल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना खा.जाधव यांनी सन १९९५ ला पहिल्यांदा आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेऊन ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. तसेच त्यांनी आ.संजय गायकवाड यांनी विकास कामांची स्तुती केली. बुलढाणा जिल्ह्यात जसे पत्रकार भवन आहे तसे उपराधानीच्या ठिकाणी सुद्धा नाही असे म्हणत आपल्या जिल्ह्याचे पत्रकार भवन आमच्यासाठी सुद्धा भूषणावह बाब असल्याचे यावेळी म्हणाले

पत्रकारांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याविषयी बिनधास्त लिहावे- आ.गायकवाड
यावेळी बोलतांना आ.संजय गायकवाड सन १९९३ -९४ ला मी नगरसेवक असताना पत्रकार भवनाला जागा मिळावी असा प्रस्ताव आला होता. तो मंजूर झाला होता.आता पत्रकार भवनाचे काम माझ्या हातून पूर्णत्वास जात असल्याचा आनंद आहे आहे. एकनाथ शिंदे हे एवढ्या संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री आहेत की बुलडाणा जिल्ह्यात जसे पत्रकार भवन झाले तसे इतर जिल्ह्यातही ते करून देतील, असे ते म्हणाले. जिल्ह्यात नशाखोरी, अवैध धंदे , गाड्या चोरी, .मुली सुरक्षित नाहीत. पानटपरीत दारू मिळत आहे. पत्रकारांनी यावर निर्भिडपणे लिहिले पाहिजे. माझेही चुकत असले तर बिनधास्त लिहून ते निदर्शनास आणून देण्याचे आवाहन आ.संजय गायकवाड यांनी बोलतांना केले. तसेच आ.गायकवाड यांनी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगितले.

यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रमुख संदीप काळे यांनी समायायेचीत मनोगत व्यक्त केले.तर देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवन असावे, त्या माध्यमातून लोकांना त्यांच्या अडचणी मांडता आल्या पाहिजेत. पत्रकारांना सुद्धा हक्काची जागा असावी. जिथे चूकत असेल तेथे संबधित अधिकाऱ्यांना , राजकीय नेत्यांना आरसा दाखवण्याचे काम पत्रकारांनी करणे अपेक्षित आहे, असे पोहरे म्हणाले. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी म्हणाले काही गोष्टी विधिलिखित असतात. गेल्या काळात कित्येक लोकप्रतिनिधी आले आणि गेले. मात्र या पत्रकार भवनाचे भूमिपूजन आ.संजय गायकवाड यांच्या हस्ते होणे विधिलिखित होते, असे सांगितले. प्रास्ताविकात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी पत्रकार भवनाच्या इतिहासाला उजाळा देत अनेक मंत्र्यांना या कामासाठी भेटलो मात्र काम लालफितशाहीत अडकत गेले, मात्र आ.संजय गायकवाड यांनी शब्द पाळला. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात पत्रकार भवनाला आतापर्यंत एवढा निधी मिळाला नाही, एवढा निधी आ.गायकवाड यांनी खेचून आणल्याचे बर्दे म्हणाले. तसेच त्यांनी पत्रकारांच्या घरांचा प्रश्न निकाली लावावा, अशी मागणी आ.संजय गायकवाड यांच्याकडे केली. मान्यवरांच्या हस्ते बीसीसीएनला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपादक सुधाकर अहीर व मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमर राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन पत्रकार संदीप चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून पत्रकार बांधव नागरिकांची उपस्थिती होती.