Monday, May 25, 2026
Home Buldana श्रीक्षेत्र माकोडी येथे खोपडी बारसनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

श्रीक्षेत्र माकोडी येथे खोपडी बारसनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

257

मोताळा (BNUन्यूज) मोताळा तालुक्यातील श्रीक्षेत्र माकोडी येथे चातुर्मास समाप्ती निमित्त खोपडी बारस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३, ४ व ५ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन चैतन्य मंदिर परिसरात करण्यात आले आहे. समर्थ सदगुरु श्रीहरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमांना राहणार आहे. श्रीराम नामाच्या प्रचार अन् प्रसारासाठी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सदगुरु श्रीहरी महाराज यांच्या दर्शनाचा लाभही भाविकांना घेता येणार आहे.

खोपडी बारस हा माकोडी भक्तांसाठी वार्षीक धार्मिक महोत्सव असतो. त्यामुळे तिन दिवस सदगुरु भक्तांची मांदीयाळी पहावयास मिळते. कोरोना काळामुळे हे उत्सव दोन वर्ष अंतर्गत स्वरूपातच साजरे झाले होते. ३ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता काकड आरतीने महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर पुजाविधी स्थापना व सकाळी ८ वाजता श्रीहरी महाराजांच्या हस्ते होमकुंड प्रज्वलीत करण्यात येईल. सकाळी ११ वाजेपर्यंत रामनामाच्या गजरात हवन पार पडणार आहेत. दुपारी १२ वाजता आरती नंतर प्रसाद, दुपारी ३ ते ५ होमहवन, सायंकाळी ६ वाजता दैनंदिन उपासना व नंतर प्रसाद वाटप होईल. एकदशीला ४ नोव्हेंबरला पहाटे काकडा आरती, ७ ते ११ होमहवन, दुपारी आरती फराळ प्रसाद, त्यानंतर ३ ते ५ होमहवन यजमान जोडप्यांच्या हस्ते पार पडेल. दरम्यान मलकापूर, निरपूर, जळगाव, जामोद, धा. बढे, लिहा यासह पंचक्रोशीतील अनेक पायीदिंड्यांचे श्रीक्षेत्र माकोडी येथे आगमन होईल. रात्री ८ वाजता हभप.डॉ.कल्याणीताई पद्मने (अकोला ) यांचे किर्तनाचा कार्यक्रम, ५ नोव्हेंबर रोजी काकड आरती नंतर सकाळी ८.३० वाजता रामनाम जपाची श्रीहरी महाराजांच्या हस्ते यज्ञकुंडात पुर्णाहूती देण्यात येईल. सकाळी ९ वाजता समर्थ सदगुरु श्रीहरी महाराजांचे मुख्य मार्गदर्शन होईल. दरम्यान उपस्थित भाविकांना श्रीहरी महाराजांच्याहस्ते कापड प्रसादाचे वितरण होणार आहे. हभप ज्ञानेश्वरमाऊली निरपुरकर यांचे किर्तन, नंतर दुपारी नैवद्य आरती झाल्यावर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी तुळशी विवाहाने सोहळ्याची सांगता होईल. दरम्यान २८ ऑक्टोबर पासून अखंड पहारा सुरू होणार असून पंचक्रोशीतील भाविक ही सेवा देणार आहेत. या सोहळ्यासाठी राज्यातील अनेक भागातून भाविकांचे आगमन श्रीक्षेत्र माकोडी येथे सुरु झाले आहे.

Don`t copy text!