अंत्री येथे बैलाचा बिबट्याने पाडला फडशा; शेतकऱ्याचे 60 हजाराचे नुकसान !

338

बिबट्याच्या मुक्त संचाराने रोहिणखेड, टाकळी, वाघजाळ,
अंत्री, परडा, वारुळी शिवारातील शेतकरी झाले त्रस्त!

मोताळा(BNUन्यूज)- मोताळा वनपरिक्षेत्रातंर्गत असलेल्या रोहिणखेड, टाकळी, वाघजाळ, परडा, अंत्री, परडा या शिवारात अनेकवेळा शेतकऱ्यांन बिबट्याचे दर्शन झाले आहे. रोहिणखेड येथील शेतकऱ्याचे गोठ्यात बांधलेल्या दोन जनावरे ठार केल्याची घटना यापुर्वी सुध्दा घडलेला आहेत. 11 नोव्हेंबरच्या रात्री गोठ्यात बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला चढवून अंत्री येथील शेतकरी राजेंद्र जवरे यांच्या 60 हजार रुपये किमतीच्या बैलाचा फडशा पाडला आहे. यामुळे शेतकरी व मजूर वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरीपामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास ऐनवेळी निसर्गाने हिरावून नेला आहे. पावसाळा चांगला झाल्याने शेतकऱ्यांची रब्बीच्या पिकांवर मोठी आशा निर्माण झाली असतांना रोहिणखेड, टाकळी, वाघजाळ, अंत्री, परडा शिवारात बिबट्याच्या मुक्तसंचाराने शेतकरीवर्ग मोठा चिंताग्रस्त झाला आहे. 11 नोव्हेंबर रोजी मोताळा तालुक्यातील अंत्री येथील शेतकरी राजेंद्र जवरे यांनी रात्री शेतातील गोठ्यामध्ये त्यांचे पशुधन बांधले होते. दरम्यान मध्यरात्री बिबट्याने अचानक एका बैलावर हल्ला चढवून फडशा पाडला, यामध्ये शेतकरी राजेंद्र जवरे यांचे अंदाजे 60 हजाराचे नुकसान झाले आहे. तसेच यापुर्वी सुध्दा रोहिणखेड येथील एका शेतकऱ्याचे दोन बैल बिबट्याने फस्त केले होते. यावेळी मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी, संबंधित रोहिणखेड बिट वनपाल व वनमजूर यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नव्हती. उलट शेतकऱ्यांना मेलेल्या जनावरांना बिबट्यापुढे टाकण्याचा बालीश सल्ला दिला होता.

मोताळा वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने अतिक्रमण धारक जंगलात तर जंगलातील हिस्त्र प्राणी गावात येवू लागल्याच्या चर्चांना उधाण आले आहे, असे असतांना वनविभागाचे अधिकारी मात्र वरकमाईमुळे मुंग गिळून बसले आहेत. मोताळा वनपरिक्षेत्रातील रोहिणखेड बिटमध्ये जवळपास 3 ते 4 हिंस्त्र बिबट्यांनी उन्माद माजविला आहे. 12 नोव्हेंबरच्या रात्री टाकळी वाघजाळ शिवारात रात्री रब्बीच्या पिकांना पाणी देतांना सुर्यकांत शिराळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांना रात्री 9.30 ते 10 वाजेच्या दरम्यान दर्शन झाल्याने टाकळी(वा.), अंत्री, पुन्हई, रोहिणखेड, वारुळी, परडा येथील शेतकरी भयभीत झाले आहे. सदर बिबट्यांचा वनविभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी लक्ष देवून सदर बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

रोहिणखेड व परडा शिवारील 3 जनावरे केली फस्त..

यापुर्वी सुध्दा रोहिणखेड येथील शेतकरी भिका आप्पा बोंद्रे यांची गाय 30 सप्टेंबरच्या रात्री बिबट्याने फस्त केली होती, तर 30 ऑक्टोबरच्या रात्री वारुळी परडा शिवारातील मलगुंडे यांची गाय ठार केली. आता 11 नोव्हेंबरच्या रात्री अंत्री शिवारातील राजेंद्र जवरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला आहे. वनविभागाने सदर हिंस्त्र प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर सदर हिंस्त्र प्राणी माणसांवर हल्ला चढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.