कामगारांचे प्रश्न शासनाने तात्काळ निकाली काढावे स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे कामगार मंत्री खाडे यांना निवेदन

122

बुलडाणा-(BNU न्यूज) महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाच्या वतीने राज्यातील कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ कामगारांना कोणत्याही प्रकारचे विलंब न करता तात्काळ त्यांना सदरच्या योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य सुरेश खाडे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाची स्थापना २००८ ते आतापर्यंत मंडळाच्या राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनेच्या जाहिरातीमुळे तसेच २०१९ मध्ये शासनाने राबविलेल्या जनजागृती अभियानामुळे बहुसंख्य कामगारांनी नोंदणी केली आहे. परंतु नोंदणीचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे कामगारांना लाभाकरीता विलंब होत असल्याने मंडळाच्या वतीने जिल्हयाच्या ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कामगार नोंदणी सुविधा केंद्रे सुरू करण्यात यावे, जिल्हा कामगार कार्यालयातील कर्मचारी संख्येत वाढ करण्यात यावी, नोंदणी व नुतनीकरण लाभाचे अर्ज तात्काळ निकाली काढून बांधकाम मजूर व कामगारांना त्याचा फायदा होईल, इमारत व इतर बांधकाम मंडळाकडून प्रत्येक कामगारांची कामगार असल्याची तपासणी करूनच मंडळात नोंदणी करावी, नोंदीत कामगारांचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या वारसाला १० दिवसाच्या आत प्रकरण काढण्यात यावे, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या पाल्यांना आपल्या मंडळामार्फत १ लाख रू. अर्थसहाय देण्यात येते. त्या नोंदीत व जिवित कामगारांचे उत्पन्न मर्यादा निश्चीत करून लाभ देण्यात यावा, घर बांधणीसाठी कामगाराला कोणतेही राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाही. मंडळामार्फत नुतनीकरण झालेल्या कामगारांना घरबांधणीसाठी ४ लाख रु. अर्थसहाय देण्यात यावे, यासह आदी न्याय्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कामगार मंत्री यांना देण्यात आले निवेदनावर संस्थापक अध्यक्ष चांद शाह, उपाध्यक्ष बलदेव सावळे यांच्यासह संजय भालेराव, रमेश राजपूत, ज्ञानेश्वर नेवरे, सादिक पटेल, दत्ता पाटील, श्याम बोरले, मलबुल शाह, कुबान शाह, शे नजीर यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.