विशेष प्रतिनिधी-सुरेश तायडे
मोताळा(BNUन्यूज) मोताळा शहरात चोरट्यांनी आपले नेटवर्क पुन्हा सक्रीय केले असून गुरुवारचा आठवडी बाजारासह रात्रीच्या वेळी आता दुकानांनाही टारगेट केले असून शुक्रवारी रात्री दोन दुकाने फोडून 45 हजाराचा 264 रुपयांचा मालावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. गुरुवारी सुध्दा एका इसमाची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व दुसऱ्या इसमाचा 16 हजाराचा मोबाईल गुरुवारी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने मोताळा शहरात ‘ब्रेक के बाद’ चोरटे पुन्हा सक्रीय झाले असल्याची चर्चा सुरु आहे.
गुरुवार १५ सप्टेंबर रोजी मुर्ती येथील दामोधर रामु सोनुने या ज्येष्ठ नागरीकाला एका इसमाने भाजी घेवून देण्याच्या नावाखाली गप्पामध्ये गुंग करीत 50 हजाराची अंगठी लंपास केली. सदर घटना मोताळा आठवडी बाजारातील पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर घडली. अंगठीचे बिल नसल्याने सदर ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली नसल्याची चर्चा आहे. तर परडा येथील संदीप बोराडे हे बाजार करीत असतांना त्यांच्या पॅन्टच्या खिश्यामधून 16 हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने लंपास केला होता. याबाबत बोराडे यांनी बोराखेडी पोस्टे.ला फिर्यादी दिली आहे. तर शुक्रवारी चोरट्यांनी मोताळा शहरातील आठवडी बाजारामधील शे.अफसर मनीयार यांच्या ममता बँगल्स दुकानामागील पत्रा वाकवून दुकानातील कटलरीसह इतर 44 हजार 264 रुपयांचा माल चोरुन नेला. तर दुसऱ्या ठिकाणी असलेल्या विजय भगवान दोडे यांचे दुकानाचा सुध्दा पत्रा वाकवून दुकानातील तराजु पितळी पारडे व लोखंडी साखळ्या असा 1 हजार रुपयांचा मालावर हात साफ केला आहे. याबाबत बोराखेडी पोस्टे.ला शे.अफसर मनीयार यांचे फिर्यादीवरुन भादंवीचे कलम ४६१, ३८० अन्वये अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांचे नेटवर्क पावरफुल..
मोताळा येथे दर गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो, या बाजारामध्ये 60 ते 70 गावातील नागरिक व व्यावसायीक बाजारासाठी येतात. या आठवडी बाजारामध्ये छोट्या-मोठ्या चोऱ्या व मोबाईल लंपास तसेच मोटार सायकल चोरी झाल्याच्या घटना नियमीत घडतात. परंतु आजपर्यंत त्या चोरट्यांना पकडणे हे बोराखेडी पेालिसांना शक्य झाले नसल्याने पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नेटवर्क पावरफुल असल्याची खमंग चर्चा मोताळा शहरात रंगली आहे.