पदाचा दुरुपयोग करणे प्रकरण अंगलट आले! पिं.नाथ ग्रा.पं.च्या दोन सदस्यांचे सदस्यपद अपात्र घोषीत!

703

बोरकरांनी 42 हजाराचा धनादेश तर सौ.घोरपडे यांनी पतीच्या नावे 35 हजार केले आरटीजीएस!!
मोहन कारंडे यांनी दाखल केले होते अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात प्रकरण

बुलढाणा(BNUन्यूज) मोताळा तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंपळगाव नाथ ग्रा.पं.सदस्य यदाजी पांडूरंग बोरकर यांना सदस्य पदाचा दुरुपयोग करुन 42 हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी तसेच ग्रा.पं.सदस्या संगीता घोरपडे यांनी आरटीजीएसद्वारे 35 हजार रुपये हस्तांतरीत केल्या प्रकरणी बुलढाणा अपर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी दोघांचेही सदस्यपद अपात्र घोषीत केल्याचा आदेश 12 ऑक्टोबर रोजी पारीत केला आहे.

मोहन नामदेव कारंडे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 1 (ग) अन्वये यदाजी बोरकर रा.ईसालवाडी सदस्य गटग्रामपंचायत पिं.नाथ यांचेविरुध्द अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. त्यांनी गट ग्रामपंचायत पिं.नाथ सदस्य यदाजी बोरकर यांनी डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत सिमेंटचे रस्ते बनविण्यासाठी शासनाकडून कंत्राट घेवून स्व:तचा गैरकायदेशीर फायदा करवून घेण्याच्या हेतूने ग्रामपंचायतकडून रेती वाहतूक करण्याचे काम स्वीकारीत बोरकर यांनी सदस्य पदाचा दुरुपयोग करुन स्वत:चे नावे 42 हजाराचा धनादेश स्वीकारला असून ग्रा.पं.अधिनियम कायद्यानुसार तसा व्यवहार करता येत नाही. तसेच त्यांना पिं.नाथ गटग्रामपंचायत सचिव बबन जाधव यांनी कोणताही ठराव न घेता रेतीचे काम यदाजी बोरकर यांना दिले असून त्यांनी रेतीचा दर अवाजवी ठरविला आहे. यदाजी बोरकर यांनी ग्रामपंचायतच्या व्यवहारात हस्तक्षेप करुन प्रत्यक्ष स्वत:च्या नावे 42 हजार रुपयांचा धनादेश स्वीकारल्याचे स्पष्ट होत असून त्याबाबत कोणतेही कायदेशीर पुरावे ते सादर करु शकले नसल्याने ग्रा.पं.अधिनियम कलम 14 1 (ग)च्या तरतुदीनुसार भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने यदाजी बोरकर यांचे पिं.नाथ सदस्यपद अपात्र घोषीत करण्यात आले.

सौ.संगिता घोरपडे यांचेही सदस्यपद अपात्र घोषीत..
तर मोहन कारंडे यांनी दाखल दुसऱ्या प्रकरणात पिं.नाथ गट ग्रामपंचायत सदस्य सौ.संगिता सुरेश घोरपडे यांनी ग्रामपंचायतच्या व्यवहारात हस्तक्षेप करुन स्वत:च्या पतीच्या नावे 35 हजार आरटीजीएसद्वारे हस्तांतरीत केल्याचे स्पष्ट झाले, त्याबाबत त्या कोणतेही स्पष्टीकरण सादर करु शकलेले नसल्याने सौ.संगिता घोरपडे यांनी ग्रामपंचायतच्या व्यवहारात हस्तक्षेप करुन आर्थिक हितसंबंध जोपासल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14-1 (ग)च्या तरतुदीचा भंग केल्याचे दिसून आल्याने त्यांचे सदस्यपद आदेशाच्या दिनांकापासून पुढील कालावधीता अपात्र घोषीत करण्यात आल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी 12 ऑक्टोबर रोजी पारित केला आहे. (संग्रहीत डमी फोटो)