लेखी आश्वासनाने काही वेळातच आंदोलनाची सांगता
Buldana News Update
बुलढाणा(4 Dec.2022) मोताळा शहरातून जाणाऱ्या नांदुरा-मोताळा रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याने मोताळा वासीय व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. अनेक अपघात सुध्दा झालेले आहेत. धुळीमुळे नागरिकांच्या फुफुसाच्या आजारात वाढ झाली आहे. नागरिक व व्यापाऱ्यांची समस्या घेवून आज 4 डिसेंबर रोजी आ.संजय गायकवाड यांनी मोताळा नांदुरा रोडवरील आठवडी बाजारामध्ये कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले. यावेळी आंदोलन कर्त्याना ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली, या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. रास्ता रोको आंदोलनमुळे रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाची सार्वजनिक बांधकामाचे विभागाचे मलकापूर उपविभाग अधिकारी एस.एन.तायडे यांनी दखल घेत आ.संजय गायकवाड व व्यापाऱ्यांशी चर्चा करुन आजपासून रोडच्या सिंगल कोटच्या कामाला सुरुवात केल्याचे लेखी आश्वासन दिल्याने दुपारी 12 वाजेच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.
मोताळा ते नांदुरा या रोडचे काम अनेक वर्षापासून संथ गतीने सुरु आहे. रत्याचे काम अर्धवट असल्याने मोताळा शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर गिट्टी टाकल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडून शहरातील व्यापाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. धुळीमुळे अनेकांना फुफुसाचे आजार झाले. तसेच या रोडवर अनेकवेळा अपघात झाले आहेत. परंतु ढेपाळलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यामुळे नागरीकांच्या समस्येत मोठी वाढ झाली होती. मोताळा येथे दर गुरुवारी आठवडी बाजार असल्याने मोठी कोंडी होती. या रस्त्याबाबत व्यापारी व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करुन देखील कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्याने मोताळा शहरवासीय व व्यापाऱ्यांच्या वाढत्या समस्या पाहता मोताळा शहर शिवसेना व व्यापाऱ्यांच्यावतीने मोताळा शहरातील नांदूरा रोडवरील आठवडी बाजारामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये मोताळा शहर शिवसेना, युवासेना, तालुका शिवसेना, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आक्रमक रास्ता रोको आंदोलनाची काळी वेळातच सा.बां.चे अधिकारी यांनी दखल घेत आ.संजय गायकवाड व आंदोलनकर्त्यांशी चर्चा करीत लेखी आश्वासन दिल्याने शिवसेनेच्यावतीने आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आहे.
आंदोलन करणे हा माझा पिंडच-आ.संजय गायकवाड
मुख्यमंत्री शिवसेनेचा, मंत्री शिवसेनेचे, आमदार शिवसेनेचा मग आ.संजय गायकवाड रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी शहरवासीय, व्यापारी व शिवसैनिकासोबत आंदोलन का करतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल परंतु आंदोलन करणे हा आ.संजय गायकवाड यांचा पिंडच असल्याचे सांगत आ.गायकवाड म्हणाले की, या रस्त्याच्या कामासाठी शासनाने तीन वर्षापुर्वी 120 कोटी रुपये टाकले आहे. कामाचा कार्यारंभ आदेश होवून तीन वर्ष झाले. 2 वर्षात काम करणे पुर्ण करणे गरजचे होते, परंतु कोरोनामुळे 1 वर्ष वाढविण्यात आले. परंतु कंत्राटदाराने त्याचे काम सबमीट केले. मुळ एजन्सी काम करत नसल्यामुळे या कामाचा त्रास नागरिकांना होवून सरकार बदनाम होत असेल नागरिकांच्या हक्कासाठी कंत्राटदार व प्रशासनाविरोधात आंदेालन केल्याचे आ.गायकवाड म्हणाले. तसेच शहरातील ज्या व्यापाऱ्यांचे दुकान खाली गेले व नाली वर आली गावातील पाणी त्यामध्ये जाते त्याचा सर्व्हे करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले. दोन दिवसात रोडच्या कामाला सुरुवात केली नाही तर परिणाम भोगावे लागतील अशा इशारा सुध्दा आ.गायकवाड यांनी सा.बां.विभागाला दिला आहे.