उदघाटक प्रा. डॉ. सुरज मंडल; स्वागताध्यक्ष सुनील शेळके
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (7 Apr.2023) ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे चिंतन शिबीर ९ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सूतगिरणी चौकातील रेड वेलवेट रेस्टॉरंटमध्ये आयोजित केले आहे. या शिबिराचे उदघाटन बी. पी. मंडल यांचे नातू व दिल्ली विश्वविद्यालयाचे प्रा. डॉ. सुरज मंडल यांच्या हस्ते होणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके स्वागताध्यक्ष असणार आहेत. शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांनी केले आहे.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय तथा राज्य शासकिय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे बिगर राजकीय संघटन आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा देणारी ही संघटना आहे. संघटनेची पुढील दिशा व ध्येयधोरणे ठरवण्याच्या उद्देशाने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चिंतन शिबीर आयोजित केले आहे. माहिती पुस्तिका व संकेतस्थळ प्रकाशन सोहळा यावेळी होणार आहे. प्रथम सत्रात उदघाटन व प्रकाशन सोहळा होईल. कार्यक्रमाचे उदघाटक प्रा. डॉ. सुरज मंडल हे ‘भविष्य का ओबीसी आंदोलन वास्तव मे कैसा होना चाहिए’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सत्यशोधक शिक्षक सभेचे सचिव मंडळ सदस्य प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड हे प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. सद्यस्थितीत ओबीसी अधिकारी कर्मचारी यांच्या पुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करतील. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. दुसऱ्या सत्रात पुढील दिशा, ठराव व समारोप होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सिद्धार्थ भरणे हे ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मिळणाऱ्या शिष्यवृत्ती व त्यातील अडचणी या विषयावर प्रमूख मार्गदर्शन करणार आहेत.
कोण आहेत प्रा.सुरज मंडल
मंडल आयोगाने ओबीसी प्रवर्गाला शासकीय नोकऱ्यांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले. आरक्षणाचा लाभ मिळाल्याने ओबीसींना विकासाची दारे खुली झाली. बी. पी. मंडल या आयोगाचे अध्यक्ष होते. प्रा. डॉ. सुरज मंडल हे त्यांचे नातू असून दिल्ली विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या चिंतन शिबिराचे उदघाटन सुरज मंडल यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या चिंतन शिबिराकडे लागले आहे.