दिलासा: जालिंदर बुधवत यांच्यासह ठाकरे गटाचे पाचही उमेदवारी अर्ज कायम!

392

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधकांचा निकाल

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाण (18Apr.2023) बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ‘न भूतो’असा विकासात्मक पातळीवर झालेला बदल हा जालिंदर बुधवत यांच्या सभापती काळामध्ये घडून आलेला आहे. नव्याने निवडणूक प्रक्रिया होत असल्याने त्यांच्यासह 5 जणांच्या उमेदवारी अर्जावर तक्रारीचे राजकारण झाले. मात्र जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक एस. व्ही. बदनाळे यांच्यापुढील अपिलाच्या निकालात जालिंदर बुधवत यांच्यासह पाचही जणांचे अर्ज कायम करण्यात आले असल्यामुळे ठाकरे गटासाठी आणि महाविकास आघाडीसाठी ही आनंदवार्ता ठरली आहे.

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागलेली आहे. यासाठी बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह पाच जणांच्या उमेदवारी अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला. मूळतः जालिंदर बुधवत यांनी सहकारी संस्था सर्वसाधारण या मतदारसंघांमधून नाम निर्देशन ३ एप्रिल २०२३ रोजी दाखल केले होते. त्यासोबत सर्व दस्तऐवजांची पूर्तता देखील केलेली होती. मात्र ५ एप्रिल रोजी विरोधकांकडून तक्रार करण्यात आली. व्यापारी व अडत व्यवसायाचे लायसन असल्यामुळे ते शेतकरी ठरू शकत नाही. त्यामुळे नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात यावे असा लेखी आक्षेप घेण्यात आला होता. यावर स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज नामंजूर केले. अर्थात त्यावेळी काय घडले असावे याचा अंदाज मायबाप शेतकरी तथा सामान्य जनतेला आलेला होता. सत्तेच्या राजकीय दबावापोटीच योग्य असतानाही आणि समोरासमोर लढण्याची हिंमत नसल्यानेच विरोधक हे कटकारस्थान करत असल्याचे जालिंदर बुधवत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले देखील होते. महत्त्वाचे म्हणजे जालिंदर बुधवत यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच व्यापारी म्हणून असलेले त्यांचे लायसन हे रद्द करण्यात आलेले ( १३/११/२०२२ रोजी चे)सर्व पुरावे सोबत जोडलेले होते. बाजार समितीचा त्याबाबतचा ठराव ही अर्जासोबतच देण्यात आलेला होता. त्यामुळे जालिंदर बुधवत यांच्यासह अन्य पाचही जण यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्थात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अपिलाद्वारे दाद मागितली. ज्येष्ठविधीज्ञ व्हि. डी. पाटील यांनी जालिंदर बुधवत यांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. यामध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम २०१७ मध्ये नियम १० मधील तरतुदीनुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे दिवशी अर्जदार व्यापारी अडत परवानाधारक नसल्यामुळे त्यांना शेतकरी मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्यास पात्र ठरत असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी जिल्हा निवडणूक अधिकारी कृउबास तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. एस. व्ही. बदनाळे यांनी जालिंदर बुधवत यांचे तसेच अपिलात गेलेल्या अन्य चार सहकाऱ्यांचे अपील मंजूर केले असून ते उमेदवार म्हणून कायम राहणार आहेत. सोबतच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारी अर्जाचे विधीमान्य नामनिर्देशन पत्राची यादी मध्ये समावेश करावे अशी आदेशही पारित केले. त्यामुळे जालिंदर बुधवत व त्यांचे सहकारी हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक लढण्यास पात्र ठरले आहेत.

पाचही उमेदवारांचे अर्ज कायम..

जालिंदर आश्रुबा बुधवत (सेवा सहकारी सर्वसाधारण मतदारसंघ ), सुनील अशोक गवते (सेवा सहकारी सर्वसाधारण मतदारसंघ ), राजू फकीरबा मुळे (सेवा सह. इमाव मतदारसंघ ), सुधाकर एकनाथ आघाव (अडते व व्यापारी मतदारसंघ) , रुखमाबाई अजबराव पिंपळे ( सेवा सहकारी महिला राखीव मतदार संघ) या पाचही उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज कायम झाले आहेत.

शेतकरी व मतदारांचे आर्शिवाद मागणार-जालिंधर बुधवत

ज्या-ज्या संस्थेवर अथवा मतदारसंघात आपल्याला काम करण्याची संधी मिळते, तिथे विकासात्मक काम करून जनसुविधा निर्माण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची सात वर्ष आधीची ‘अवस्था’ आणि भरीव विकास कामांमुळे निर्माण झालेली आजची ‘भक्कम स्थिती’ मायबाप शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेपुढे आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या निकालात आम्हाला न्याय मिळाला आहे. आता विकास कामाच्या बळावर निवडणूक रिंगणात शेतकरी व मतदारांच्या पुढे जाणार असून त्यांच्या आशीर्वाद मागणार आहोत.
-जालिंदर बुधवत जिल्हाप्रमुख (उ.बा.ठा.) बुलढाणा