उच्च न्यायालयाची विरोधकांना चपराक! जालिंदर बुधवत यांच्या उमेदवारी विरोधातील याचिका रद्द

311

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (21.Apr.2023) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज नाममंजूर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांच्या न्यायालयात अपिलात गेलेल्या जालिंदर बुधवत व सहकाऱ्यांचे अर्ज कायम ठेवण्यात आले होते. मात्र विरोधकांनी उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली आणि जालिंदर बुधवत यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने विरोधकांना एकप्रकारे चपराक दिली असून संबंधित याचिकाच खारीज करण्यात आल्याची माहिती जालींधर बुधवत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा सलग ११ महिने करू न शकणारी कृषी उत्पन्न बाजार समिती ‘ड’ वर्गातून ‘अ’ वर्गामध्ये आणली. या बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत व्यापारी गाळे, पेट्रोल पंप अश्या प्रकारे नव्याने निर्माण करून विकासात्मक बदल जालिंदर बुधवत यांनी सभापती काळामध्ये घडवला. बुलढाणा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितरित्या लढत आहे. मात्र नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत जालिंदर बुधवत यांच्या उमेदवारी अर्जावर भाजप- शिंदे गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता. सोबतच अन्य चार सहकाऱ्यांच्या उमेदवारीवर देखील आक्षेप घेण्यात आला. सर्व कागदपत्र पुराव्यानिशी जोडलेले असतानाही उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले होते. अर्थात हा सत्तेच्या दबावाचा भाग होता हीच चर्चा गावगावात आहे. महत्वाचे म्हणजे या निर्णयाविरोधात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक एस. व्ही. बदनाळे यांच्याकडे जालिंदर बुधवत यांचे सह पाचही सहकाऱ्यांनी अपील दाखल केले. यात जिल्हा उपनिबंधकांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालाला नागपूर येथील उच्च यालयामध्ये याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड.सुनील देशमुख , श्रीकांत पवार, ओमसिंग राजपूत, मोहन पवार, यांनी ही तक्रारवजा याचिका (२५७०/२०२३) दाखल केली. राजु मुळे व सहकाऱ्यांच्या संदर्भातही अशाच प्रकारची याचिका ( २५७४/ २०२३) दाखल करण्यात आली. मात्र न्यायालयाने याचिका खारिज केल्या असून जालिंदर बुधवत यांच्या विरोधकांना एक प्रकारे चपराकच लगावली आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे पॅनल बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढणार असून या पॅनलचं मुख्य नेतृत्व जालिंदर बुधवत हे करत आहेत.

बुलढाणा बाजार समितीमध्ये जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात सकारात्मक स्वरूपात झालेली विकास कामे दिसून येतात. तक्रारीचे राजकारण बाजार समितीला नवे नाही. गेल्या पाच – सहा वर्षाच्या कार्यकाळात बुधवत यांच्या नेतृत्वात होत असलेल्या विकास कामाच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. अनेक वेळा तक्रारीचा मायनासारखा राहिला मात्र तक्रारदारांचे चेहरे तेव्हढे बदलले. तरीही बुधवत यांनी आपले सकारात्मक काम सुरूच ठेवले. ‘ज्या झाडाला चांगली फळ असतात त्यालाच लोक दगड मारतात’ असं म्हणतात. जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वातच ही निवडणूक जिंकून बाजार समितीचा हा विकासरथ जोमाने पुढे नेऊ, अशी आम्हाला खात्री असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील गवते, राजू मुळे यांनी संयुक्तरीत्या दिली आहे.