जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बुलढाणा शहरातून भव्य सायकल रॅली

232

जिल्हाधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी दाखविली रॅलीला हिरवी झेंडी

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (22.Apr.2023) जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सामाजिक वणीकरण विभाग, राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने आज शनिवार 22 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता पृथ्वी वाचवा व पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने शहरातील विविध भागातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. एच.पी.तुम्मोड यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.

गांधी भवनातून प्रारंभ झालेली सायकल रॅली शहरातील जुना गाव, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, संगम चौक, बस स्थानकासमारून चिंचोले चौक, सर्क्यूलर रोडने त्रिशरण चौक, चिखली रोडने जात वनविभागाच्या राणीबागेत या सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीत प्रबोधन विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरण मित्र डांगे यांनी गोरीला माकडाचा गणवेश परिधान करून जंगल वाचवा प्राणी वाचवा हा संदेश दिला. तसेच उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या हस्ते राणीबगीच्यात जागतिक वसुंधरेच्या भितीचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल विश्वास थोरात, अभिजीत ठाकरे राष्ट्रीय हरित सेना शिक्षक रविंद्र गणेशे, अनिरूद्ध माकोने, डांगे, बापु देशमुख, चंद्रकांत काटकर उपस्थित होते. संचलन वनक्षेत्रपाल विश्वास थोरात यांनी केले. यशस्वीतेसाठी वनपाल रमेश गिते, सतिष इंगळे, वनरक्षक संजय दळवी, आनंद दारमोडे, निलेश राजपूत, सोनाली गावंडे, जोत्सना देवगावकर, संतोष शिंगणे, दिलीप भोंबे, विजय लांडे, विश्वनाथ वाघोदे यानी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती..

या कार्यक्रमाला जिप मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विसपूते, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, जिल्हा उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, सहा. वनसंरक्षक सारीका घेवंदे, प्रजापित्ता ब्रम्हकूमारीच्या प्रमुख दिदि, मिनल आंबेकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व सायकल रॅलीत सहभागी विद्यार्थी व नागरिकांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली. तसेच प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या वतीने वसुंधरा वाचवा या विषयावर मुग्धा कंगले हीच्या चमूने नृत्य सादर केले.