दुहेरी हत्याकांडाने चिखली शहर हादरले;  किशोरने पत्नी व चिमुकलीला संपवून स्वत: घेतला गळफास !

64

BNU न्यूज नेटवर्क..
चिखली (21 Aug.2023) श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने चिखली शहरातील संपूर्ण वातावरण प्रसन्न होते. दरम्यान सकाळी किशोर कुटे क्रुर माणसाने पोलिस पत्नी वर्षा दंदाले कुटे व दीड वर्षीय चिमुकलीवर चाकूने वार करीत त्यांना संपविले. सदर हत्याकांड शहरातील खामगाव रोडवरील पंचमुखी महादेव मंदीर परिसरात घडले. किशोरने सुध्दा कवठळ येथील गांगलगाव रोड लगत असलेल्या शेतातील विहिरीत गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना सोमवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मायलेकींच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण चिखली शहर हादरुन गेले आहे.

प्राप्त माहितीनुसार वर्षा दंदाले-कुटे ह्या चिखली येथे पोहेकाँ.म्हणून कर्तव्यावर होत्या. त्या चिखलीत खामगाव रोडवरील पंचमुखी महादेव मंदिराजवळ आपल्या दोन मुली व कुटुंबीयासोबत भाड्याने राहत होत्या. वर्षा कुटे यांचे मूळगाव देऊळगावराजा तालुक्यातील गव्हाण तर किशोर कुटे हा खैरव ता. चिखली येथील रहिवासी होता. नोकरी नसल्याने किशोर गावाकडे शेती सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या घटनाक्रमानुसार किशोर सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास स्कुटीने बाहेर पडतांना दिसत असल्याने त्याने सकाळी 9.33 ते 9.42 वाजेच्या दरम्यान 35 वर्षीय पत्नी वर्षा कुटे व दीड वर्षीय चिमुकलीवर निर्दयीपणे चाकूने वार करुन दुहेरी हत्यांकांड घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. मोठी मुलगी शाळेत गेलेली असल्याने तिचे प्राण मात्र वाचले. खून केल्यानंतर किशोरने घटनास्थळावरुन पोबारा केला व कवठळ येथे गांगलगाव रोड लगत असलेल्या विहिरीत दोरीच्या साह्याने गळफास घेतला. सदर घटना शेतमालक विष्णू वाघमारे हे आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना रोडवर काळ्या रंगाची स्कुटी उभी दिसल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एक अनोळखी इसम दोरीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी घटनेची माहिती अंढेरा पोलिसांना दिली. पोलिस पथकाने घटनास्थळी जावून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने किशोरचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदर दुहेरी हत्याकांड का घडले, हे मात्र समोर आले नाही. घटनेचा पोलिस तपास करीत आहेत.