ज.जामोद नगर परिषदमध्ये दिव्याखाली अंधार; लाचखोर मुख्याधिकाऱ्याला 12 हजाराची लाच घेतांना पकडले !

114

BNU न्यूज नेटवर्क..
ज.जामोद-(13 DEC.2023) पथदिव्यांच्या देखभालीचे तसेच इतर कामांचे बिल काढण्यासाठी मुख्याधिकारी आकाश डोईफोडे व विद्युत पर्यवेक्षक दिपक शेळके या दोन लाचखोरांना 12 हजाराची लाच घेतांना आज 13 डिसेंबर रोजी बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर परिषद येथे रंगेहाथ पकडले. या कारवाईने ज.जामोद शहरात खळबळ उडाली आहे.

लाचखोर मुख्याधिकारी आकाश अविनाश डोईफोडे व विद्युत पर्यवेक्षक दिपक कैलास शेळके या दोघांनी तक्रारदाराला त्याच्या कंपनीने जळगाव जामोद नगर परिषद अंतर्गत केलेल्या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीच्या कामाचे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरचे बिल तसेच इतर कामाचे बिल अदा केले, याचा मोबदला म्हणून आरोपी दिपक शेळके व आकाश डोईफोडे यांनी प्रत्येकी 6 हजार असे 12 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रादाराने बुलढाणा लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत आज बुधवार 13 डिसेंबर रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दिपक शेळके याला त्याचे व डोईफोडे याचे 12 हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. वृत्तलिहेपर्यत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरु होती.

यांच्या पथकाने केली कारवाई

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक अमरावतीचे पोलिस अधिक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधिक्षक देविदास घवारे, बुलढाणा पोलिस उपअधिक्षक शितल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सचिन इंगळे, महेश भोसले, स.फौजदार शाम भांगे, पेाहेकॉ.विलास साखरे,प्रविण बैरागी, रवी दळवी, पोना.जगदीश पवार, विनोद लोखंडे, पोकाँ.शैलेश सोनवणे, मपोकॉ.स्वाती वाणी,चालक पोना.नितीन शेटे, पोकाँ.अरशद शेख यांच्या पथकाने केली.