सकाळी आकस्मीक मृत्यूची नोंद; राड्यानंतर सायंकाळी पती, सासु व मामसासऱ्यावर 306 चा गुन्हा दाखल !

71

धा.बढे येथील विवाहिता आत्महत्या प्रकरण

मोताळा: साहेब…, माझ्या सुनेने गळफास घेवून आत्महत्या केली. सून दरवाजा उघडत नसल्याने, दरवाजा उघडल्यानंतर सून ज्योती मंगेश शहाणे झोक्याच्या कडीला (Suicide) लटकलेली दिसल्याच्या अनिता शहाणेच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी सकाळी 10.46 ला आकस्मीक मृत्यूची नोंद केली. तर ज्योतीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंतिमसंस्कार करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा माहेरच्यांनी घेतल्याने धा.पोलिसांनी अखेर सायंकाळी 4.56 वाजता पतीसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा लागला.

एकीकडे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही, तर दुसरीकडे सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेला आत्महत्या करावी लागल्याची घटना मोताळा (Motala)तालुक्यातील धा.बढे येथे 3 मार्च रोजी उघडकीस आली. सासूने प्रथम सून दरवाजा उघडत नाही, मुलासह धक्का देवून दरवाजा उघडला असता सून ज्योती मंगेश शहाणे झोक्याच्या कडीला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली. मात्र घटनेची माहिती मिळताच ज्योतीच्या माहेरकडील मंडळींनी राडा करीत ज्योतीला कामधंदा येत नाही, चांगली दिसत नाही, असे म्हणून पती मंगेश अरुण शहाणे, सासू अनिता अरुण शहाणे हे ज्योतीला घरगुती कारणावरुन मारहाण करुन शारिरीक व मानसिक त्रास देत होते. तर मामसासरा प्रदीप ज्योतीविरुध्द अनिता शहाणे व मंगेशला भडकावून देत, तीला सोडून दे, दुसरे लग्न कर असे म्हणून त्रास देत असल्याने ज्योतीने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, असे सांगत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यत प्रेत उचलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता.

साहेब…मुलीने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली

सकाळी 9.46 वाजता आकस्मीक मृत्यूची नोंद असलेल्या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली. साहेब..ज्योतीने सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, अशा प्रमिलाबाई छरें कोऱ्हाळा बाजार यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी सायंकाळी 4.56 वाजेच्या सुमारास ज्योतीच्या आत्महत्येप्रकरणी पती मंगेश अरुण शहाणे, सासू अनिता अरुण शहाणे व मामसासरा प्रदिप याच्यावर भादंवीचे कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल केला.