Saturday, April 18, 2026
Home Buldana प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 ;सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 ;सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

10

9 हजार रुपये विद्यावेतनासह नामांकित कंपन्यांत कामाची संधी

बुलढाणा- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ (PMIS) च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कॉर्पोरेट जगात कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांचे कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आता 12 एप्रिल 2026 पासून नवीन नियम व अधिक सवलती लागू होणार आहेत.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि बदल: निवड झालेल्या उमेदवारांना आता दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. यातील काही हिस्सा कंपन्यांमार्फत, तर उर्वरित रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) उमेदवाराच्या खात्यात जमा होईल. वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली असून, आता 18 ते 25 वर्षे वयोगटातील युवक या योजनेसाठी पात्र आहेत. 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधरांसह आता पदव्युत्तर (Post Graduate) आणि MBA झालेले विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत. इंटर्नशिपचा कालावधी 6 ते 9 महिने इतका असेल. तसेच, रुजू झाल्यानंतर आकस्मिक खर्चासाठी उमेदवाराला ६,००० रुपये एकरकमी सानुग्रह अनुदान दिले जाईल.

नोंदणी प्रक्रिया आणि अटी:

इच्छूक उमेदवारांनी सरकारच्या अधिकृत पोर्टल pminternship.mca.gov.in वर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. एका उमेदवाराला जास्तीत जास्त 3 वेगवेगळ्या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. उमेदवार सध्या पूर्णवेळ नोकरी करत नसावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.

या योजनेद्वारे सेमीकंडक्टर, रिन्यूएबल एनर्जी आणि आयटी यांसारख्या 20 पेक्षा जास्त क्षेत्रांतील 300 हून अधिक आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा या कार्यालयाच्या ०७२६२-२४२३४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Don`t copy text!