Friday, April 17, 2026
Home Buldana करवंड महोत्सव: छत्रपती शिवाजी महाराज व गुणवंताबाईंचा विवाह सोहळा थाटात साजरा

करवंड महोत्सव: छत्रपती शिवाजी महाराज व गुणवंताबाईंचा विवाह सोहळा थाटात साजरा

5

ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही- ना.शिवेंद्रराजे भोसले

बुलढाणा- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेब यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला ३७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, करवंड येथे प्रथमच ‘ऐतिहासिक करवंड महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा मिळण्यासोबतच, किल्ले व बुरुजाचे संवर्धनासाठी आणि भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व करवंड महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऐतिहासिक करवंड महोत्सवा’चे आयोजन चिखली तालुक्यातल करवंड येथे करण्यात आले होते. यावेळी विधान परिषद आमदार धिरज लिंगाडे, विधानसभा आमदार श्वेता महाले, आ.संजय गायकवाड, आ. सिद्धार्थ खरात, आ.मनोज कायंदे, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक विद्याधर महाले, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, राजेंद्र पोळ, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, अनिकेत निंबाळकर आयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. १५ एप्रिल १६५७ रोजी झालेल्या या ऐतिहासिक विवाहाचे स्मरण म्हणून आयोजित या कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांचा विवाह सोहळा केवळ एक कौटुंबिक प्रसंग नसून स्वराज्याच्या उभारणीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. या भूमीला ऐतिहासिक महत्त्व असून, येथील पडझड झालेल्या बुरुजांचे पुनरुज्जीवन करणे आणि राजवाड्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. करवंड येथील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून विशेष प्रकल्प मंजूर करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने महाराणी गुणवंताबाई यांचा भव्य पुतळा उभारणे, ऐतिहासिक राजवाड्याची डागडुजी करणे आणि पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचा विकास करणे, या कामांना प्राधान्य दिला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हा महोत्सव आणि स्मारकाचे काम केवळ शासन किंवा प्रशासनाचे नसून, यामध्ये स्थानिक ग्रामस्थ आणि सर्व शिवप्रेमींचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय परवानग्या मिळवण्यासाठी ग्रामपंचायत व स्थानिकांनी सहकार्य करावे, जेणेकरून पुढच्या वर्षी हा सोहळा अधिक भव्य स्वरूपात साजरा करता येईल, असे आवाहनही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवद्रराजे भोसले यांनी याप्रसंगी केले.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व गुणवंताबाई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर शिव विवाह सोहळा पार पडला. विविध शाळा व संस्थांचे लक्षवेधी कार्यक्रमही येथे पार पडले. महोत्सवासाठी महत्त्वाची भूमिका घेत आ.श्वेता महाले यांनी शासन स्तरावर ही बाब रेटली व महोत्सव घडवून आनला. यावेळी बोलताना त्यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. त्या म्हणाल्या, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन व पुनर्जीवन व्हावे यासाठी मागील ४० वर्षांपासून शिवप्रेमींची मागणी होती. मात्र त्या वेळच्या सरकारांनी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भावनेकडे दुर्लक्ष केल.महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवप्रेमींना नवी आशा निर्माण झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर शिवप्रेमींनी हा उत्सव आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला व देवा भाऊच्या शासनाने इतिहासजमा झालेला करवंड चा इतिहास पुन्हा पुनर्जीवित केला. असे आ. श्वेताताई महाले पाटील यांनी सांगितले. ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६ने करवंडनगरीला राज्यस्तरीय ओळख मिळवून दिली असून महाराणी गुणवंताबाई साहेब यांचा गौरवशाली वारसा जपण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आज उचलले गेल्याचे आ.श्वेताताई म्हणाल्या. प्रास्ताविक प्रा. वसने यांनी केले तर सूत्रसंचालन प्राची सावजी, भास्कर आढळकर यांनी तर आभार अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी मानले.

करवंड येथे गुणवंताबाईचे भव्यदिव्य स्मारक व्हावे- आ.श्वेताताई महाले

आ.श्वेताताई महाले पाटील यांनी उपस्थित मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या त्यांनी मांडल्या. करवंड गावात राणी गुणवंताबाई साहेब यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. आ. संजय गायकवाड यांनीही विधानसभेत याच मागणीचा पाठपुरावा केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. त्याचप्रमाणे करवंड गावाच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित ५२ बुरुजांच्या प्रतिकृतीही येथे बसवण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने या मागण्या मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Don`t copy text!