मोताळा : आनंद हे परमेश्वराचे स्वरूप आहे. आपल्या ठायी असणारा हा आनंद चाखण्यासाठीच निर्गुण निराकार परमेश्वर विश्वाच्या रूपाने सगुण साकार झाला. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ ही दिव्य अनुभूती येणे म्हणजेच देवाचा साक्षात्कार होय. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे, असे प्रतिपादन सद्गुरू वामनराव पै यांचे शिष्य संतोष तोत्रे यांनी केले.
नांदुरा रोडवरील आदर्श नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र मोताळा येथे १२ व १३ एप्रिल रोजी २ दिवसीय समाज प्रबोधन महोत्सवात ‘सुखी जीवनाचा पासवर्ड’ या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते, त्यावेळी संतोष तोत्रे बोलत होते. पुढे बोलतांना तोत्रे यांनी सुखाच्या शोधार्थ जगातील प्रत्येक माणूस धावत असतो. पण जीवनात सुख त्याच्या हाताला लागत नाही. पण सर्व सुखाचा आराम असा राम आपल्याच हृदयात आहे. आपल्या ठायी असलेले सुख आपण इतरांना देतो तेंव्हा ते हजारपटीने परत आपल्याकडे येते व आपल्या जीवनात सुखाची बरसात होते. इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले असून दुसर्यांच्या दु:खात आपले दुःख दडलेले आहे, असे ते म्हणाले. जगातील प्रत्येक प्राणी, पशू- पक्षी, वृक्ष- वेली, नद्या – नाले, डोंगर- पर्वत आहेत म्हणून आपण जगतो. पर्यावरणाच्या रूपाने प्रत्यक्ष नारायण प्रगट आहे. म्हणून ‘पर्यावरण हाच नारायण’. पर्यावरणाची जोपासना हीच ईश्वराची उपासना असल्याचे त्यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी ज्ञानसाधना केंद्र मलकापूर उपकेंद्र मोताळा येथील नाम धारकांनी परिश्रम घेतले.


























