बुलढाणा: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा तथा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने 9 मे रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोटार अपघात प्रकरणामध्ये 1 कोटी 21 लाख 25 हजार रुपये तडजोडीने अदा करण्यात आले. तर 789 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यापोटी 16 कोटी 25 लक्ष 19 हजार 207 रुपयांचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आला.
जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे 9 मे रोजी आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये बँक, ग्रामपंचायत, नगर परिषद तसेच भारतीय दुरसंचार निगम तसेच राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे दाखलपूर्व 51 हजार 495 प्रकरणे दाखल असलेल्या प्रकरणातील 11 हजार 738 प्रकरणी ठेवण्यात आली होती त्यापैकी 351 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यापोटी 16 कोटी 3 लाख 54 हजार 167 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. बँक, ग्रामपंचायत, नगर परिषद, भारतीय दूरसंचार निगम आणि विघुत वितरण कंपनी यांचे दाखलपूर्व 11, 780 दाखल प्रकरणपैकी 438 प्रकरणे निकाली काढण्यात आली, त्यापोटी 26 लाख 65 हजार 40 दंड अशाप्रकारे जिल्ह्यात 23,518 प्रकरणापैकी 789 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यापोटी 16 कोटी 25 लाख 19 हजार 207 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा एस.डी.जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली शेख अकबर शेख जाफर बुलढाणा जिल्हा न्यायाधिश -1, जिल्हा न्यायाधिश-2 तथा अति.सत्र न्यायाधीश ए.जी.संतानी, सत्र न्यायाधिश एस.ई.घोरपडे, निवृत्त न्यायाधिश श्रीमती पी.ए.खंडारे 4 थे सह दिवाणी न्यायाधिश कनिष्ठस्तर बुलढाणा असे एकूण 3 पॅनल व 1 विशेष न्यायालय कार्यरत होते. सदर पॅनलवर अॅड.वाय.वाय.जाधव, अॅड.संदीप पांचाळ, अॅड.डी.पी.गोठी यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.विजय सावळे व सर्व विधिज्ज्ञांनी राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीतेसाठी योगदान दिले.


























