बुलढाणा- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत, जिल्ह्यातील खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची लॉटरी प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश २० एप्रिल २०२६ पर्यंत निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यांतर्गत या शैक्षणिक वर्षासाठी एकूण २२६ शाळांमधील २९३३ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी जिल्हाभरातून एकूण ६१७१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधून २८०१ विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी दि. १० एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आली आहे.निवड झालेल्या बालकांना १० ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी समितीकडे जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश अंतिम करावा. केवळ SMS वर अवलंबून न राहता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बालकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी पालकांनी जिल्हास्तर व तालुका स्तरावरील शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


























