बुलढाणा- महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी सुशिक्षित व्हावी, आत्मनिर्भर व्हावी आणि समाजात तिला मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०२३ पासून ‘लेक लाडकी’ योजना कार्यान्वित केली आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यापासून ते त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक पाठबळ देणारी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून शासन केवळ आर्थिक मदतच करत नाही, तर सामाजिक बदलाचा पाया रचत आहे. या योजनेचे प्रमुख उद्देश मुलींच्या जन्मदरात वाढ करणे आणि स्त्री भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देऊन शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे, बालविवाह सारख्या अनिष्ट प्रथांना आळा घालणे, मुलींमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करून त्यांचा मृत्यूदर घटवणे हे आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील महिलांसाठी आणि मुलींसाठी सुरू असलेल्या लेक लाडकी योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळत आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२३ पासून आजपर्यंत १३ हजार १०१ लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून, १० हजार ९८६ मुलींना प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे. या कालावधीत ५ कोटी ४९ लाख ३० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
या योजनेत अंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपये इतके अनुदान दिले जाते. मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीप्रवेश घेतल्यावर ६ हजार रुपये, इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्यावर ७ हजार रुपये, इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८ हजार रुपये, वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये याप्रमाणे वितरण केले जाते.
पात्रता आणि अटी : ही योजना १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुलींसाठीच लागू आहे. कुटुंबातील पहिल्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल. जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तरीही मुलीला लाभ दिला जाईल. दुसऱ्या अपत्याच्या लाभार्थ्यांसाठी पालकांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे : मुलीचा जन्माचा दाखला, तहसीलदारांचा १ लाख रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला, लाभार्थी मुलगी आणि पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार ओळखपत्र, शाळेचा दाखला आणि मुलगी अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र.
‘लेक लाडकी’ योजना ही केवळ आर्थिक मदत नसून, ती मुलींच्या भविष्यासाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मिळणारी ७५ हजार रुपयांची रक्कम मुलीला तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी मोलाची ठरू शकते. गरजू कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या भागातील अंगणवाडी सेविका किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
– संकलन
सतिश आनंदराव बगमारे,उपसंपादक
जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा


























