बुलढाणा: महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत. परंतु त्या कायद्याचे अस्तित्व कागदावरच असल्याने महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. त्यातच महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. अमरावती परिक्षेत्रामध्ये 27 दिवसात 308 महिला व मुली बेपत्ता झाल्या असून त्याचे दरदिवशीचे प्रमाण 11.4 एवढे आहे. अमरावती परिक्षेत्रात बुलढाणा जिल्हा अव्वलस्थानी असून 27 दिवसात बुलढाणा जिल्ह्यातून रेकॉर्डब्रेक 89 बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार दिवसेंनदिवस वाढत आहे. त्यामध्ये महिलांचे बेपत्ता होण्यामुळे मोठी भर पडली आहे. अनेक बेपत्ता झालेल्या महिला घरी परत येतात. काही मुली लग्नाची माहिती आई-वडिलांच्या त्याची माहिती देतात, पालक त्यांना स्वीकारतात सुध्दा. परंतु ज्या मुली कुटुंबीयांच्या निर्णयाविरुध्द प्रेमविवाह करतात त्यांचे नातेसंबंध कायमचे तोडल्या जात असल्यामुळे त्या जोडप्यामध्ये वादविवाद झाल्यास त्या मुलींचे पुढे काय होते? याची माहिती गृहविभागाने जारी करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, महिला मंडळांनी आवाज उठविणे गरजेचे आहे.
अमरावती परिक्षेत्रामध्ये 1 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत 308 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यामध्ये 18 ते 25 वयोगटातील महिला व मुलींचे मोठे प्रमाण आहे. परिक्षेत्रात सर्वाधिक बुलढाणा जिल्ह्यातील 89 महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्या पाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील 82, यवतमाळ जिल्हा तृतीयस्थानी असून जिल्ह्यातील 81, अकोला जिल्ह्यातील 38, वाशिम जिल्ह्यातील 18 अशा एकूण 308 महिला व मुलीं बेपत्ता झाल्या आहेत.
183 पुरुष हरविल्याची नोंद
तरुण मुले व पुरुषांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत खूप कमी आहे. अमरावती परिक्षेत्रात 183 पुरुष बेपत्ता झाले असून त्याचे प्रमाण दरदिवशी 6.7 एवढे आहे. पुरुष बेपत्ता झाल्याच्या यादीत यवतमाळ अव्वलस्थानी असून 56 पुरुष बेपत्ता झाले आहेत. द्वितीयस्थानी बुलढाणा जिल्हा असून जिल्ह्यातील 55, अमरावती जिल्हा 48, अकोला जिल्हा 12, वाशिम जिल्ह्यातील 12 अशी हरविल्याची नोंद आहे.

























