मोताळा : राज्यासह जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून मोताळा तालुक्यातील राहेरा येथे एका 46 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना आज रविवार 10 मे रोजी सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव बबन जाधव असे आहे.
राहेरा येथील रहिवासी अल्पभूधारक शेतकरी बबन देविदास जाधव (वय 46) यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. शेतीला लावलेला खर्च निघाला नाही, तर दुसरीकडे खाजगी पतसंस्थेचे कर्ज कसे फेडावे? कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवचनेत ते सापडले होते. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून राहेरा शिवारातील एका धरणात आत्महत्या केली. सदर घटना आज 10 मे रोजी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास उघडीस आली. बबन जाधव यांच्यावर खाजगी पतसंस्थेसह इतर असे 5 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती कुटुंबीयांनी देत आर्थिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी 2 वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


























