Tuesday, May 12, 2026
Home Buldana प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करा- निलेश जाधव

प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करा- निलेश जाधव

1

अन्यथा ‘बोम्बा बोम्ब’ आंदोलन छेडू; वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बुलडाणा- मोताळा नगर पंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी यांची हकालपट्टी करुन कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्यात यावा, अन्यथा ‘बोम्बा बोंम्ब’ आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना आज मंगळवार 12 मे रोजी एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच मोताळा नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी यांच्या कामावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. यामुळे आता मोताळा नगर पंचायतीला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळेल का ? याचे चित्र काही दिवसात स्पष्ट होणार का? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.

मोताळा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मागसलेला आहे असा ठपका मोताळा तालुक्याला अधिकारी यांच्या निष्काळजीपणा मुळे लादलेला आहे. मोताळा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे नगरपंचायत आहे. विभा वऱ्हाडे बदलून गेल्यापासून नगर पंचायतीचा प्रभारी मुख्याधिकारी म्हणून गणेश पांडे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे प्रभार देवून 3 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांनी जेव्हापासून नगरपंचायतचा प्रभार घेतला तेव्हापासून पासून ते फक्त महीन्यातून एखादाच दिवस नगरपंचायतला हजेरी लावीत ठेकादारांनकडून टक्केवारीचे नगदी रक्कम घेतात, असा आरोप वंचितने निवेदनात केला असून त्यामुळे शहरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नगरपंचायतीचा विकास खुंटला असल्याचा आरोप निवेदनात केला आहे

काही दिवसाअगोदर ३८ कोटी पाणीपुरवठा योजना कार्यरत झाली तरी सुध्दा मोताळा वासीयांनी अशुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पाण्यामध्ये ब्लिचींग पावडरचा अभाव असल्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसापुर्वी मोताळा येथील नांदुरा रोडवर विश्राम गृहाजवळ मोठ्या थाटात मराठा मंगल कार्यालायचे उद्घाटन पार पडले, मात्र त्या जागेवर आजरोजी शहरातील संपूर्ण घाण कचरा टाकल्या जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहरात महिने झालीत काही रस्ते हे खोदून टाकलेले आहे पण आजसुध्दा त्या रस्त्यांचे काम सुरु झालेले नाही.

प्रभारी मुख्याधिकारी यांच्यामुळे मोताळा शहरातील विकासकामांना मोठी खिळ बसलेलीआहे. त्यांना सामान्य जनतेने आपण नियमीत का येत नाही ? असा प्रश्न विचारलातर ते सरळ सांगतात मी मंत्रालयामध्ये पैसे देवून येवढी वर्ष काढलीत.. मला राजकीय वरदहस्त असल्यामुळे माझे तुम्ही काहीच करु शकत नाही, असे उत्तर देवून मोकळे होतात. यामुळे शहरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचे शहरातील विकास कामे किंवा नगर पंचायतीच्या वसुलीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कराचा भरणा होत नसल्यामुळे शहराच्या विकास कामांना खिळ बसली असून जे वेळेवर पाणीकर व घरकर भरतात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वंचितने केलेल्या गंभीर आरोपाबाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही.

करोडोंचा खर्च जनता मात्र तहानलेली?

वार्ड क्र १४,१५,१६ मधील जनतेला ३८ कोटीची पाणीपुरवठा योजना होऊन देखील त्या वार्डमध्ये जनतेला जुन्याच पाण्याच्या टाकीमधुन अस्वच्छ पाणीपुरवठा नेहमीच होत असते. सांगळद येथील पाण्याच्या टाकीला ओव्हरफ्लो नसल्यामुळे पाण्याची टाकी भरल्यानंतर ते पाणी थेट टाकीवरुन खाली पडत असल्यामुळे एखाद्या दिवशी ही पाण्याची टाकी कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. कचरागाडी सुद्धा नियमित सुरु ठेवल्या जात नसल्यामुळे महिला खुल्या खाजगी जागेत कचरा टाकतात, त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

वंचितचा 15 दिवसांचा अल्टीमेटम

प्रभारी मुख्याधिकारी यांची तात्काळ हकालपट्टी करुन मोताळा नगर पंचायतीला कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्यात यावा, जेणेकरुन मोताळा शहराचा विकास होवून नागरिकांना अद्यायावत सुविधा मिळतील. मागणीचा गांभीर्यपूर्वक तत्काळ निर्णय घ्यावा, यासाठी वंचितने 15 दिवसांचा प्रशासनाला अल्टीमेटम दिला असून कार्यवाही न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने ‘बोंम्बा बोंम्ब’ आंदोलन छेडण्याचा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, तालुकाध्यक्ष मनोज खरात,समाधान डोंगरे,शेषराव मोरे,रविंन्द्र मिसाळ,संजय धुरंधर,प्रकाश गुजर,कृष्णा बनकर,प्रविण खरात,अनिल जाधव,संजय खराटे,दगडू मोरे,नविन मोरे यांच्यासह आदींच्यावतीने देण्यात आला.

 

Don`t copy text!