मानधनवाढ व ग्रॅज्यूटीच्या निर्णयाची सरकारने तातडीने
अमंल बजावणी करावी- कॉ.पंजाबराव गायकवाड
बुलढाणा(BNUन्यूज)-अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात दिवाळी पूर्वी भरघोस वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे आणि महिला व बालविकास मंत्री यांनी केली. त्याची बातमी वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये व टीव्ही चॅनल्सवर सातत्याने दाखविण्यात आली. परंतू त्यानंतरच्या एकाही कॅबिनेट मिटींग मध्ये त्याची साधी चर्चा ही झाली नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर हि फसवी घोषणा करून सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच एकप्रकारे काम केले आहे, याचा निषेध व प्रलंबीत मागण्यांसाठी सीटू च्या नेतृत्वात आज 1 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर कॉ.पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर या अंगणवाडी महिलांचा एक प्रकारे अपमान केला आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सरकाने आपल्या घोषणेवर ठाम राहून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान २२ हजार रूपये मासिक मानधन लागू करावे, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिलेले निकृष्ठ मोबाइल शासनाला परत केले. त्यात असलेले इंग्रजी भाषेतील अॅप बदलून मराठीत करून देण्यात यावे, मा.उच्च न्यायालयाने सुद्धा अंगणवाडी सेविकांच्या बाजूने निकाल दिला आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्य सरकारने ताबडतोब अंमलबजावणी करावी. पोषण आहाराचा दर्जा निकृष्ठ आहे. अंगणवाडी केंद्राचे भाडे थकित आहेत. प्रवास भत्ता गेल्या दोन वर्षांपासून मिळालेला नाही, मुख्यसेविकांची सेविका मधूनच पदभर्ती करण्यात यावी, यासह आदी न्याय्य मागण्याचे निवेदन उपमुख्यकार्यकारी अधिकारी अरविंद रामरामे यांच्या मार्फत राज्याचे महिला व बालविकास मंत्री तथा प्रधान सचिव यांना संघटनेच्या वतीने पाठविण्यात आले.
ह्या आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या..
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांवर प्रशासनाकडून खाजगी मोबाइलवर काम करण्याची सक्ती करुन मानधन कपातीची धमकी देण्यात येत आहे, हा उच्च न्यायालयाचा अवमान आहे. ही दडपशाही प्रशासनाने तात्काळ बंद करावी. तसेच २५ एप्रिल २०२२ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या ग्रॅज्यूटी मिळण्यास पात्र आहेत. त्या मानधनी नसून वेतनधारी आहेत. ज्या प्रमाणे मुख्य सेविकांना ग्रॅज्यूटीचा लाभ मिळतो तसाच लाभ अंगणवाडी सेविकां मदतनीसांना मिळाला पाहिजे. अंगणवाडी सेविका ह्या मुलांना पुर्व प्राथमिक शिक्षण देतात म्हणून त्या शिक्षिका आहेत. त्यामुळे त्यांना ग्रॅज्यूटी मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्वाचा निर्णय देऊन अंगणवाडी सेविकां व मदतनीसांना फार मोठा दिलासा दिला आहे.
कॉ.पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन..
आंदोलनात सीटू जिल्हाअध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे, मंदा डोंगरदिवे, सरला मिश्रा, बेबिताई दाते, जयश्री क्षिरसागर, निशा घोडे, ,उषा जैवळ, अपेक्षा शिंगणे, मिना इंगळे, पुष्पलता खरात, वैशाली चाहकर, संगिता मोरे, नंदा मोरे, मिना नांगरे, संगीता मादनकर, माया डिवरे, उर्मिला खेडेकर, अनिता ठेंग, राजश्री महाजन, सुवर्णा लाटे, अनिता गवई, माया लाटे, शुभांगी वाघोदे, अर्चना सोळंके यांच्यासह सेविका मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.