चांडोळ येथे शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या!

713

बुलढाणा (BNUन्यूज) जिल्ह्यात सततची नापीकी तसचे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील 63 वर्षीय शेतकऱ्याने परतीच्या पावसामुळे हाती आलेले पीक गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडल्यामुळे भुजंगराव जंजाळ यांनी घरात लोखंडी गंजाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

चांडोळ येथील शेतकरी भुजंगराव माधव जंजाळ (वय ६3) हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. शेतीच्या भरवश्यावरच संपूर्ण कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. यावर्षी परतीच्या पावसामुळे शेतातील तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. उसणे पैसे घेवून त्यांनी शेतीला खर्च लावलेला होता, लावलेला खर्चही निघाला नसल्यामुळे कर्ज कसे फेडावे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा? या विवंचनेतच त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. अशोक जंजाळ यांच्या फिर्यादीवरुन धाड पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला. भुजंगराव जंजाळ यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या पश्चात 3 मुली व 1 मुलगा असा बराच मोठा परिवार आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजेश मानकर हे करीत आहे.