जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु;कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
बुलढाणा(BNUन्यूज) सर्वात जास्त इमानदार प्राणी कोण, असा सवाल उपस्थित होताच नाव समोर येते ते कुत्र्याचे, परंतु तो कुत्रा पिसाळला तेंव्हा तो हिंसक बनून माणसावर जीवघेणा हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी करु शकतो. अशीच एक घटना 25 नोव्हेंबर रोजी सैलानी येथे उघडकीस आली. येथे कुत्र्यांचानी एका वृध्द महिलेवर हल्ला चढवित त्या महिलेला गंभीर जखमी केले. जखमी महिलेचे नाव गायत्रीबाई बावस्कर असल्याचे समजते. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचार सुरु आहेत.
अनेक वर्षापासून हिवरा ता.जळगाव येथील गायत्रीबाई बावस्कर ही वृध्द महिला राहते, सदर महिला झोपलेली असतांना त्यांच्यावर 25 नोव्हेंबरच्या रात्री पिसाळलेल्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात कुत्र्यांनी गायत्रीबाईच्या कपाळाचे लचके तोडल्याने त्या गंभीर झाल्या, सदर घटना 25 नोव्हेंबरच्या सकाळी गावकऱ्यांच्या निदर्शनास आली. महिला गंभीर जखमी झाल्याने किंचाळत होती, तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. गावकऱ्यांनी माणूसकीचे दर्शन घडवित सदर महिलेला मदतीचा हात देत जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी..
येथे अनेकवेळा पिसाळलेल्या कुत्रयांनी लहान मुले, महिला व पुरुषांवर हल्ले चढविल्याचे प्रकार घडलेले आहेत. सैलानी येथे मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते हिंसक झाले असून मागील वर्षी कुत्रयांच्या हल्ल्यात एका 10 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला होता, हे येथे उल्लेखनीय! सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.