मोताळा- महाराष्ट्राच्या मातीतील रांगडी संस्कृती आणि ढोल-ताशांचा कडकडाट आता केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नसून, तो सातासमुद्रापार पोहोचला आहे. भारताचे पंतप्रधान (Narendra Modi) नरेंद्र मोदी सध्या नेदरलँड्सच्या दौऱ्यावर असून, तेथे त्यांचे स्वागत अत्यंत शाही आणि सांस्कृतिक पद्धतीने करण्यात आले. या स्वागताचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे नेदरलँड्सच्या भूमीवर घुमलेला मराठी ढोल-ताशांचा आवाज, या पथकामध्ये मोताळा तालुक्यातील तळणी येथील सुपुत्र दिपक पुंजाजी नाफडे यांचा सहभाग असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिपक नाफडे हे व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता असून सध्या नेदरलँड्समध्ये एका नामांकित कंपनीत कार्यरत आहेत. नोकरीच्या निमित्ताने परदेशात स्थायिक होऊनही त्यांनी आपली संस्कृती, परंपरा आणि मराठी अस्मिता जपली आहे. पंतप्रधान मोदींच्या आगमनानिमित्त तिथल्या भारतीय समुदायाने एका भव्य ढोल-ताशा पथकाचे आयोजन केले होते. या पथकात सहभागी होऊन दिपक नाफडे यांनी आपल्या कलेने नेदरलँड्सची भूमी दणाणून सोडली. दिपक हे केवळ या विशेष कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, परदेशात आपल्या मित्रपरिवारासह गणेशोत्सव, नवरात्री गरबा आणि दिवाळी यांसारखे सण उत्साहाने साजरे करत असतात. भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने तिथे एक ढोल-ताशा पथकही स्थापन केले आहे. तळणी गावचा सुपुत्र दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोल वाजवताना दिसताच तळणी गावातील ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला. गावचा सुपुत्र परदेशात उच्च पदावर काम करत असतानाही आपली संस्कृती विसरलेला नाही आणि देशाच्या पंतप्रधानांसमोर त्याने आपल्या कलेचे सादरीकरण केले, ही आमच्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे
हा क्षण अत्यंत अविस्मरणीय आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वागतासाठी ढोल-ताशा पथकात सहभागी होण्याचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचे आणि मराठी परंपरेचे सातासमुद्रापार तेही आपल्या मायभूमीच्या पंतप्रधानांच्या स्वागताला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. या क्षणामुळे मला मनापासून आनंद आणि कृतज्ञता वाटते, ही आठवण माझ्या हृदयात कायम विशेष स्थानी राहील, असे दिपक नाफडे म्हणाले.



























