Saturday, May 23, 2026
Home Breaking News आग लागल्याने शेतकऱ्याचे 2 लाखाचे शेती साहित्य जळून खाक; आगीवर वेळीच नियंत्रण...

आग लागल्याने शेतकऱ्याचे 2 लाखाचे शेती साहित्य जळून खाक; आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला

101

मोताळा- सध्या शेती तयार करण्याचे काम सुरु आहे. कोणीतरी पालापाचोळा पेटविल्यामुळे आग लागल्याने या आगीत मुर्ती येथील शेतकरी विलास भोंगे यांच्या शेतीतील दोन लाखाचे शेती साहित्य व इतर माल जळून खाक झाल्याची माहिती समोर आली. सदर घटना आज सोमवार 14 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. बुलढाणा अग्नीशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा महावितरणचे सबस्टेशन जळून खाक झाले असते.

मुर्ती शिवारात गट नं.25 मध्ये वाघजाळ धा.बढे रोडवर विलास तुकाराम भोंगे यांची शेती आहे. त्यांचे शेतात 60 टिनपत्राचे शेड आहे. ते आपले शेती साहित्य व शेतीमाल तेथेच ठेवतात. आज 14 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास जंगलाला आग लागली. आग जवळपास अर्धा कि.मी. परिसरात पोहचत विलास घोंगे यांच्या शेतातपर्यंत येवून पोहचली. घोंगे यांच्या टिनशेडला आग लागल्याने टिनशेड जळाल्याने त्यातील पीव्हीसी पाईप अडीच इंची 40 नग 20 हजार, 15 बंडल ठिंबक पारस कंपनीचे 60 हजार, खत बॅग 8 नग किंमत 9600 रुपये, भुईमुंग शेंगा 25 पोते 64 हजार, ताडपत्र्या 4 नग 12हजार, टिनपत्रे 60 नग 30 हजार, मका कुट्टी 8 ट्रॉली 14 हजार असा एकूण 2 लाख 9 हजार 600 रुपयांचा माल जळून खाक झाला. सदर घटनेची माहिती मुर्ती सरपंच श्रीकृष्ण खराटे यांनी तहसिलदार हेमंत पाटील यांना दिल्याने त्यांनी बुलढाणा नगर पालिका अग्नीशमन दलाला पाचारण केल्याने कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा भोंगे यांच्या शेताजवळील 100 मिटर अंतरावर असलेले महावितरणचे सबस्टेशन जळून खाक झाले असते. आज सुट्टी असल्याने तलाठी किंवा मंडळ अधिकारी मात्र घटनास्थळी दाखल झाले नव्हते, ते 15 एप्रिल रोजी घटनेचा पंचनामा करुन अहवाल तहसिलदारांना सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Don`t copy text!