महोत्सवाच्या तयारीला आला वेग!
बुलढाणा:छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देशभरात अनेक प्रकारचे स्मरणोत्सव, जयंती सोहळे, विजय दिन, गडकोट संवर्धन मोहीमा आणि ऐतिहासिक व्याख्याने होत असतात. परंतु शिवरायांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक घटनेशी निगडित असा बुलडाणा जिल्ह्यातील ‘विवाह स्मृती सोहळा’ अर्थात चिखली तालुक्यातील करवंड महोत्सव , करवंड या गावी मोठ्या जल्लोषात साजरा होणार, ही अभिमानाची आणि ऐतिहासिक अशी घटना ठरत आहे.या महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे.
तयारीसाठी महोत्सवाचे संकल्पक व बावन बुरजी बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील जावंजाळ पाटील,अरविंद बापू देशमुख,हरीरुद्र राजे इंगळे आणि सर्वच सहकाऱ्यांसह ग्रामस्थ कामाला लागले आहे. इ.स. १५ एप्रिल १६५६ हा दिवस स्वराज्याच्या इतिहासातील एक विशेष दिवस ठरला. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे करवंड यांचा विवाह पार पडला होता. या विवाह तिथीचा धागा पकडत शिवरायांच्या सासुरवाडी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या ऐतिहासिक गावात येत्या १५ एप्रिल रोजी भव्य ‘करवंड महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
- बुलढाणा जिल्हा शिवरायांचे आजोळ आणि सासर
करवंड हे गाव फक्त भौगोलिक स्थान नाही, तर ते स्वराज्याच्या इतिहासाशी जोडलेले एक भावनिक केंद्र आहे. याच गावातील स्वराज्याचे निष्ठावंत सरदार शिवाजीराव इंगळे हे शिवाजी महाराजांचे सासरे होते. स्वराज्य उभारणीच्या कार्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे होते. त्यांच्या कन्या गुणवंताबाई इंगळे यांचा विवाह शिवरायांशी होऊन या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच करवंड ही केवळ सासुरवाडी नाही तर ती शिवस्मृतींची पवित्र भूमी आहे. येथे प्रत्येक कणात शिवभक्ती आणि इतिहासाची साक्ष दडलेली आहे. आजपर्यंत देशभरात शिवाजी महाराजांशी संबंधित अनेक कार्यक्रम झाले, पण त्यांच्या विवाह तिथीवर आधारित असा राष्ट्रीय स्तरावरील सोहळा प्रथमच आयोजित होत आहे. या अनोख्या संकल्पनेमुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत चौकशीचे फोन येत असून अनेक शिवप्रेमी या सोहळ्यास साक्षी राहण्यासाठी उत्सुक आहेत. - गावकऱ्यांचा श्रमपरिहार :गढी पुन्हा उजळतेय
करवंड गावात सध्या उत्साहाचे लाट उसळल्या आहेत. गावकरी स्वतःहून पुढे येऊन गढी परिसर स्वच्छता व संवर्धन मोहिमेत सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून श्रमदानातून गढीची साफसफाई, परिसर सुशोभीकरण आणि तयारीचे काम जोमाने सुरू आहे. हा उपक्रम फक्त कार्यक्रमापुरता मर्यादित नसून तो इतिहास जपण्याच्या सामूहिक जाणीवेचा जागर आहे. सरपंच, पोलीस पाटील, हे स्वतः जातीने दिवसभर गढी स्थळी उभे राहून जातीने लक्षपूर्वीत आहेत. - प्रशासनाची दखल आणि सहकार्य
या ऐतिहासिक उपक्रमाची शासन स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. या महोत्सवाच्या यशासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. विशेषतः विद्याधर महल्ले यांनी या महोत्सवासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. माधवराव जपे यांच्या शेतात झालेल्या चर्चेतून त्यांनी महोत्सवासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या पुढाकारातूनच स्वच्छता मोहीम आणि तयारीचे काम गतीने सुरू झाले. तहसीलदारसाहेब विजय सवडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी कामाला फार मोठी गती आणलेली आहे.



























