Friday, May 22, 2026
Home Buldana चैत्राच्या उन्हात ग्रामीण भागात सांडोळ्या, बिबड्यांची दरवळ; पहाटे ४ ते ५ वाजेपासूनच...

चैत्राच्या उन्हात ग्रामीण भागात सांडोळ्या, बिबड्यांची दरवळ; पहाटे ४ ते ५ वाजेपासूनच गृहिणींची लगबग होते सुरु!

38

मोताळा(गणेश वाघ) उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात, विशेषतः विदर्भ आणि खानदेशात एक वेगळीच लगबग पाहायला मिळत आहे. अंगावर उष्ण उन अन् शरिरावर घामाच्या धारा, असे असतांना देखील गृहिणींना ओढ लागते ती मात्र वर्षभराच्या साठवणुकीच्या ‘वाळवणाची’ सध्या मोताळा तालुक्यातील तळणी आणि परिसरातील गावागावांत महिला सांडोळ्या, बिबड्यांचे पापड बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून या पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे.

महाराष्ट्रात ज्वारी हे मुख्य अन्न मानले जाते. याच ज्वारीपासून तयार होणारे सांडोळ्या, बिबड्या म्हणजेच ज्वारीचे पापड हे चवीला अत्यंत चविष्ट आणि पचायला सुलभ असतात. परंतु हे पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत कष्टमय आणि संयमाची असते सांडोळ्या तयार करण्यासाठी प्रथम ज्वारी चार ते पाच दिवस पाण्यात भिजत घातली जाते. त्यानंतर ती दळली जाते. चुलीवर पाणी गरम करून त्यात हे पीठ टाकून ‘खिशी’ (उकड) तयार केली जाते. या खिशीचे छोटे छोटे गोळे करून ते ताटावर लाटले जातात आणि कडक उन्हात वाळवले जातात. तर बीबड्यांसाठी भिजवलेल्या ज्वारीच्या पिठात जिरे, तिखट, मीठ आणि इतर मसाले घालून चुलीवर मोठ्या पातेल्यात ‘घाटा’ शिजवला जातो. हा गरमागरम घाटा सुती कापडावर हाताने गोल आकारात थापला जातो. हे काम अत्यंत कौशल्याचे असते. काम करण्यासाठी हाताला चटके सोसावे लागतात, मात्र तरीही गृहिणी मोठ्या आनंदाने हे काम पूर्ण करतात.

हे वाळवण बनवणे हा केवळ खाद्यपदार्थ तयार करण्याचा प्रकार नसून तो एक सामाजिक सोहळा ठरतोय. कडक ऊन पडण्यापूर्वीच, म्हणजे पहाटे ४ ते ५ वाजेपासूनच गृहिणींची लगबग सुरू होते. विशेष म्हणजे, यात ‘एकामेका सहाय्य करू’ ही वृत्ती दिसून येते. शेजारणी-पाजारणी एकत्र जमून एकमेकींना पापड लाटायला किंवा बीबडे थापायला मदत करतात. या कामाच्या ओघात रंगणाऱ्या गप्पा, किस्से आणि हास्य विनोदाने गृहिणींना उन्हाचा तडाखा आणि कामाचा थकवा कळून येत नाही.उन्हाळ्याच्या या दिवसांत घराघरांत वाळवणाचे काम सुरू असल्याने त्याचा परिणाम शेती कामांवर होताना दिसत आहे. घरातील गृहिणी आणि महिला मजूर या कामात मग्न असल्याने सध्या शेती कामासाठी मजूर मिळणे दुरापस्त झाले आहे. मजुरांची टंचाई जाणवत असली तरी, वर्षभराची बेगमी करण्यासाठी गृहिणींची ही धावपळ थांबलेली नाही.

संस्कृतिचा अविभाज्य घटक

चुलीवर भाजलेले खुसखुशीत बिबड्या, सांडोळ्या आणि त्यावर खाद्य तेल व सोबतीला शेंगदाणे ही चव हॉटेलमधील पदार्थांनाही फिकी पाडणारी असते. कडक उन्हात वाळणारे हे पदार्थ केवळ खाद्यपदार्थांची साठवणूक’ नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा आणि चवीचा एक अविभाज्य वारसाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये!

Don`t copy text!