मोताळा: वनपरिक्षेत्र कार्यालय मोताळा हद्दीत असलेल्या काबरखेड शिवारात रानडुकाराने महिलेवर हल्ला चढविला. या हल्ल्यात 45 वर्षीय ललिता सातपुते ही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार 17 मे रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने सोबत असलेल्या इतर महिला सुखरुप आहेत. महिलेवर मलकापूर येथील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.
प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील काबरखेड येथील 4 ते 5 महिला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेतात जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान अचानक ललिता माणिकराव सातपुते (वय 45) या महिलेवर रानडुकराने हल्ला चढवित ललिताबाईच्या उजव्या पायाला फाडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना मलकापूर येथील माने हास्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्या पायावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्यामध्ये रॉड टाकण्यात आले. सुदैवाने यावेळी इतर महिला व माणिकराव सातपुते पळाल्याने ते बचावले. मोताळा वनविभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. काबरखेड परिसरात रानडुकरांचा मुक्तसंचार असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त वनविभागाने करण्याची मागणी होत आहे. काही वर्षीपुर्वी काबरखेड येथील श्यामा नावाचा मुलगा रानडुकराच्या हल्ल्यात ठार झाल्याची दुदैवी घटना घडली होती.



























