धंदा छोटा कमाई मोठी: मोताळ्यातील विजय सुरळकर यांची यशोगाथा; महिन्याला कमवितात 40 हजार !

1250

वडिलांची प्रेरणा; 700 रुपयात सुरु केला होता धंदा

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (19 FEB.2023) सध्या स्पर्धेचे युग आहे, या युगात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. अनेक युवक नोकरीच्या मागे लागून हताश होतात. परंतु मोताळा येथील युवक विजय सुरळकर यांनी छोटाशा धंदा थाटून ते आज महिन्याकाठी 30 ते 40 हजार रुपये कमवितात. जाणून घेवू त्यांची यशोगाथा त्यांच्याच शब्दात..!

घरची परिस्थीती अठराविश्व दारीद्र्य शिक्षण कसेबसे दहावीपर्यंत झाले. नसिबाने साथ दिली नसल्याने सन 1995 मध्ये दहावी नापास झालो. पुढे काय करायचे हा विचार मनाला बेचैन करीत होता. दोनवर्ष रिकामे राहिल्याने विजय सुरळकर यांना त्यांचे वडिल रामभाऊ सुरडकर यांनी छोटा धंदा करण्याची प्रेरणा दिली. त्यातून विजय सुरळकर यांनी 1997 साली 700 रुपयांच्या भांडवलावर घड्याळ दुरुस्तीचा धंदा थाटून आज ते महिन्याकाठी 30 ते 40 हजार रुपये आपल्या छोट्याश्या धंद्यातून कमावितात.

मोताळा हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी तालुक्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. मोताळा शहर तर नगर पंचायतची स्थापना झाल्यापासून विकासापासून कोसो दूरच आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे औद्योगीक कारखाने किंवा रोजगार मिळण्यासारखी व्यवस्था नसल्याने शेती किंवा किराणा व कापड दुकानावर काम करण्याशिवाय पर्याय नाही. त्यातून किती मिळतील, घर चालेल का? याच विचारात मोताळ्यातील विजय सुरळकर खुप बेचैन झाले होते. आर्थिक परिस्थीती बेताची, आई-वडिल राबराब राबून चौघा भावंडाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यातील विजय सुरळकर यांचे शिक्षण कसेबसे दहावीपर्यंत झाले, त्यातही ते नापास झाले. पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यावेळी त्यांना त्यांचे वडील रामभाऊ सुरळकर यांनी त्याकाळी क्रेझ असलेल्या घड्याळ दुरस्ती व विक्री करण्याच्या सल्ला दिला. तो विजय सुरळकर यांना पटला सुध्दा त्यांनी सन 1997 साली प्रथम जळगाव खांदेश येथून 700 रुपयांचा माल आणून मोताळा आठवडी बाजारात छोटा व्यवसाय सुरु केला, व्यवसायात त्यांना मोठा पैसा मिळत गेल्याने त्यांचे मनोधैर्य वाढले.

सन 2000 मध्ये त्यांनी आपल्या घड्याळ दुरुस्तीच्या धंद्यावर बजाज एम-80 ही 21 हजाराची पहिली दुचाकी घेतली. त्या दुचाकीवर ते मोताळा, बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, शेलगाव बाजार तसेच आजुबाजूचे आठवडी बाजार करु लागले. धंद्यात नफा मिळाल्याने उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढत गेले. व्यसन नसल्याने मिळणारे पै-पै जमा करुन त्यांनी स्व:तचा प्लॉट घेवून सिमेंट कॉक्रीटचे घर बांधले. कमाविता मुलगा असल्याने विजय सुरळकर यांना चांगले संबंध आल्याने त्यांचा विवाह सन 2004 मध्ये खामगाव येथील रत्नमाला यांच्याशी झाला. त्यांना 2006 पहिली मुलगी झाली मुलीच्या जन्माचे त्यांनी स्वागत केले. विजय सुरळकर यांना तीन अपत्य आहे. मोठी मुलगी गौरी ही बारावीत असून मुलगा ओम दहावी तर आरती ही त्यांची सर्वात लहान मुलगी सहावीत शिक्षण घेत आहे. सुरळकर हे आपल्या मुलांचे शिक्षण त्यांची ट्यूशन कुटुंबीयांचा उदरनिर्वाह गॉगल विक्री व घड्याळ दुरुस्ती या छोट्याश्या व्यवसायावर करतात. अतिक्रमण हटविल्याने त्यांनी सद्या मोताळा आठवडी बाजारात आपली छोटीशी गाडी थाटली आहे. ते उन्हाळ्यात मलकापूर रोडवरील पेट्रोलपंपासमोर आपली छोटीशी दुकान थाटतात. शासन प्रत्येकाला नोकरी देवू शकत नाही. एका जागेसाठी हजारो युवक अर्ज भरतात, परंतु नोकरी एकालाच मिळत असल्याने मोठी बेरोजगारी वाढली आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता छोटा-मोठा व्यवसाय सुरु करण्याची सल्ला विजय सुरळकर यांनी ‘बुलडाणा न्यूज अपडेट’ शी बोलतांना युवकांना दिली.

  • धंद्यात कोणत्याही प्रकारची शरम नसावी..
    कोणताही व्यवसाय करतांना त्या धंद्यामध्ये शरम बाळगू नये, धंदा छोटा असो की मोठा तो आपल्याला रोजगार मिळवून देतो. त्या धंद्यात मनापासून काम केल्यास पुणे, मुंबई येथे लाखो रुपये शिक्षण करुन शिकलेले मुलांना जेवढे कंपनी पॅकेज देते, तेवढे मोताळ्यातील विजय सुरळकर कोणाचीही गुलामगिरी न करता आपल्या छोट्याश्या धंद्यावर कमवितात, हे येथे उल्लेखनीय!
  • वर्षभरासाठी आणतात 5 लाखाचा माल..
    सुरळकर यांनी सन 1997 मध्ये घड्याळ दुरुस्तीचा धंदा सुरु केला होता, त्यावेळी घडाळ्याला खूप मोठी क्रेझ होती. आता यूग बदलले असून फोरजी तथा फाईव्हजीचा जमाना असल्याने त्यांनी आपल्या धंद्यामध्ये बदल केला असून आता ते युवकांची गरज ओळखून गॉगल, चष्मे, बेल्ट, घड्याळ ठेवतात. आजरोजी सन 2023 मध्ये ते वर्षाकाठी 5 ते 6 लाखांचा माल आणून त्यातून महिन्याकाठी 30 ते 40 हजार रुपये कमवितात, असे विजय सुरळकर यांनी सांगितले. त्यांच्या व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण त्यांचा मोबाईल क्रमांक 9850525482 वर संपर्क साधू शकतात.