मधमाशांच्या हल्ल्यात 39 वर्षीय युवक ठार

68

मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोपंत येथील घटना

मोताळा-मृत्यूला कोणाला केंव्हा कवटाळील याचा नेम नाही. आणि मृत्यूच्या कचाट्यातून कोणाला जीवनदान मिळेल, हे सांगणे फार कठीण आहे. अशीच एक दुदैवी घटना मोताळा तालुक्यातील रिधोरा (खंडोबा) येथे घडली. शेतीला जात असतांना एका 39 वर्षीय युवकावर मध्यमाशांनी अचानक हल्ला चढविल्याने त्याच्या शरिराला जीर्ण केल्याने त्यामध्ये सुरेश कळमकर या युवकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.

मोताळा तालुक्यातील रिधोरा (खंडोबा) येथील सुरेश कळमकर (वय 39) हे आज 17 नोव्हेंबर सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास आपल्या शेतात जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान त्यांच्यावर सकाळी 9 ते 9.30 वाजेच्या सुमारास चवताळलेल्या शेकडो मधमांशांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जीवाच्या आकांताने ते मदतीसाठी किंचाळीत होते, परंतु आजुबाजुला कोणीही नसल्यामुळे त्यांना मदत मिळू शकली नाही.

मधमाशांच्या हल्ल्यात त्यांच्या शरीराची चाळणी झाली होती. त्या परिस्थीतीमध्ये सुध्दा कळमकर हे कसेबसे चालत रोडवर आले. त्यांना जखमी अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी बुलडाणा येथे उपचारासाठी नेत असतांना रोहिणखेड येथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, 2 मुले, 3 भाऊ, 1 बहिण असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आज 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास रिधोरा खंडोपंत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.