नांदुरा पं.स.कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ कारभार; शेतकऱ्यांचा 3 कोटी रुपयांचा निधी थांबविला!

230

@buldananewsupdate.com
नांदुरा(27Dec.2022) म्हणतात ना, सरकारी काम अन् सहा महिने थांब! त्यात काही रोजगार हमी विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना विहिरीपासून वंचित ठेवल्याची भयावही बाब उघडकीस आली आहे. नांदुरा पंचायत समिती अंतर्गत जानेवारी महिन्यात मंजूर करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या विहिरींची कामे सुरू करण्यासाठी शेतकरी एका वर्षापासून पंचायत समितीचे उंबरठे झिंजवत आहेत, शेतकऱ्यांना विहिरी मिळण्यासाठी 26 डिसेंबर रोजी पंचायत समिती माजी उपसभापती योगीता गावंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा 3 कोटी रुपयांचा निधी थांबविल्याची बाब उघडकीस आली आहे.

नांदुरा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींना सन 2021 मध्ये 105 विहिरींचे उद्दीष्ट प्राप्त झाले होते .त्यापैकी 95 विहिरींना जानेवारी 2022 मध्ये प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती, तेंव्हापासून जून, जुलै पर्यंत विहिरी खोदणे शक्य होते परंतु रोजगार हमी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध कारणे सांगत शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले. आता पावसाळा संपून 2 महिने उलटले असले तरी अद्याप विहिरी सुरू केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे नाव सांगून सध्या विहिरी करता येणे शक्य नाही, असे साहेबांचे म्हणणे असल्याचे गायकवाड या कर्मचाऱ्याने शेतकरी व काही माजी लोक प्रतिनिधींची सांगत दिशाभूल केली आहे.

शंभर शेतकऱ्यांना प्रत्येकी 3 लाखाप्रमाने मिळणारा एकूण 3 कोटींचा लाभ या कर्मचाऱ्याने आपल्या स्वार्थासाठी थांबवून ठेवल्याने संतप्त होत सोमवार 26 डिसेंबर रोजी नांदुरा पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.योगिता गावंडे यांचेसह माजी सभापती शिवाजीराव पाटील, माजी सभापती गजानन चरखे, बंडूभाऊ चोपडे, प्रशांत वडोदे, सरपंच संघटना अध्यक्ष तथा शेंबा सरपंच Adv.नंदकिशोर खोंदले, कार्याध्यक्ष तथा खदडगांव सरपंच प्रवीण मानकर, निमगांव सरपंच विकास इंगले, सिरसोडी सरपंच हर्षवर्धन सरदार, सावरगाव सरपंच भागवत लांजुळकार, अवधा सरपंच राहुल खंडेराव, विटाळी सरपंचपुत्र विष्णू क्षीरसागर यांचेसह लाभार्थी शेतकरयांनी गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्या दालनासमोर आंदोलन करताच, गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी दखल घेत रोजगार हमी योजनेच्या विहीरींची कामे तात्काळ सुरु करण्याच्या सूचना संबंधीत कर्मचाऱ्यांना दिल्याने आंदोलन तुर्तास स्थगीत करण्यात आले. परंतु विहिरींची कामे सुरु न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा सौ.गावंडे यांनी प्रशासनास दिला आहे.

..अन्यथा जि.प.सीईओंच्या दालनासमोर आंदोलन छेडू- योगिता गावंडे
शेतकऱ्यांचे जीवन उंचविण्यासाठी शासनस्तरावरु शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात येतो, मात्र रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देशच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मातीत घातला आहे. शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे माजी उपसभापती योगिता गावंडे यांनी ‘बुलडाणा न्यूज अपडेट’ शी बोलतांना सांगितले.

अशा आहेत नांदुरा तालुक्यातील मंजूर विहिरी..
नांदुरा तालुक्यासाठी 105 सिंचन विहिरींचे उद्दीष्ट असून त्यापैकी काटी ग्रामपंचायतसाठी 9 विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, तर बुर्टी. 7, धानोरा (वि) 7, विटाळी 9, सिरसोडी 11, सावरगाव नेहू 6, वडगाव दिघी 4, कोकलवाडी निरंक, पिंपळखुटा खू. 6, टाकरखेड 18, शेंबा बु.7, तांदुलवाडी 5, शेंबा खु. 4 अश्याप्रकारे एकूण 93 विहिरी मंजूर करण्यात आल्या 12 विहिरींना मंजुरी बाकी आहे.