मोताळ्यातील दुचाकीस्वराला अज्ञात वाहनाने उडविले;युवक गंभीर

1078

@buldananewsupdate.com
मोताळा(9 Jan.2023) बुलढाणा मलकापूर रोडवरील शेलापूर व घुस्सर फाट्याच्या दरम्यान रविवार ८ जानेवारीच्या सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मोताळा येथील एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले. युवकाचे नाव दिनकर(बिच्छू) सुरडकर असे आहे.

प्राप्त माहितीनुसार मोताळा येथील दिनकर निनाजी सुरडकर (वय ३२) हा युवक रविवार ८ जानेवारी रोजी आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२८ जे.६८८४ या वाहनाने सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मलकापूरकडे चालला होता. त्याला शेलापूर व घुस्सर फाट्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली, या धडकेत युवक रोडवर पडल्याने त्याच्या डोक्यातून अती रक्तस्त्राव झाला. स्थानिक नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच एका इसमाने सदर माहिती शेलापूर येथील अपघातग्रस्त युवकाच्या मामाला दिली. १०८ रुग्णवाहिकेने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे त्याचे सीटी स्वॅâन करुन त्याला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.