शेतकऱ्याच्या घराला आग लागून पशुधनासह 3 लाखाचे साहित्य जळून खाक !

453

बुलढाणा तालुक्यातील पांगरखेड येथील घटना

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (6 MAR.2023) सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळ्यात आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात. अशीच एक दुदैवी घटना बुलढाणा तालुक्यातील पांगरखेड येथे ५ मार्चच्या रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडली. यामध्ये शेतकऱ्याचे पशुधनासह ३ लाखाचे साहित्य आगीत जळून खाक झाले. सुदैवाने शिंदे कुटुंब शेजारी झोपण्यासाठी गेल्याने मोठा अनर्थ टळला.

पांगरखेड येथे रामदास शिंदे यांचे गावात झोपडपट्टी भागात घर व त्याला लागून टिनपत्र्याच्या गोठा आहे. या घराला ५ मार्चच्या रात्री अचानक आग लागली. सुसाट्याचा वारा असल्याने शिंदे कुटुंबीय शेजारी झोपण्यासाठी गेले होते. वारा जोरात सुरु असल्याने सदर घटना रामदास शिंदे यांच्या लक्षात न आल्याने त्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य तसेच ७० हजार किमतीची १ म्हैस, गाय अंदाजे किंमत ४० हजार, रोख रक्कम ३५ हजार असे एकूण ३ लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहे. घरातील साहित्य तसेच पशुधन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. आज सोमवार ६ मार्च रोजी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. शिंदे कुटुंबीयांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.