10 ट्रक नारळांची होळी पेटवून सैलानी यात्रेस प्रारंभ!

679

4 ते 5 लाख भाविकांची उपस्थिती; 12 मार्चला संदल

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (6 MAR.2023)महाराष्ट्र राज्यासह देशभरातील भाविक सैलानी येथील यात्रेत होळीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मागील तीन वर्षापासून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सैलानी बाबा यात्रा रद्द करण्यात आली होती, परंतु यावर्षी सैलानी यात्रेला परवानगी मिळाल्याने यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असून सर्वधर्मीय 4 ते 5 लाख भाविकभक्त सैलानीत दाखल झाले आहे. आज सोमवार ६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जवळपास १0 ट्रक नारळांची होळी पेटवून यात्रेस प्रारंभ झाला आहे. १२ मार्चला संदल निघणार आहे. होळीचे लाखो भक्तांनी दर्शन घेतले.

मागील तीन वर्षापासून कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर प्रशासनाच्यावतीने सैलानी बाबाची यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाचा संसर्ग ओसरल्याने यात्रेला प्रशासनाने परवानगी दिल्याने यात्रा मोठ्या प्रमाणात भरली आहे. तीन वर्षाच्या ब्रेकनंतर यात्रा मोठ्या प्रमाणात भरली आहे. या यात्रेत सर्व जाती धर्मांच्या भाविक भक्त दर्शनासाठी सैलानी येथे लाखोच्या संख्येने हजर राहून त्यांनी होळीमध्ये साहित्य व नारळ होळीमध्ये टावूâन निरोगी आयुष्याची मनोकामना पूर्ण केली जाते, अशी भविकांची श्रध्दा आहे. ढगाळ वातावरण पाहता ६ मार्च रोजी दुपारी ३.२० मिनीटांना होळीचे पुजापाठ माजी सरपंच शे.रफीक मुजावर, पंचायत समिती सदस्य शे.चाँद मुजावर हशम मुजावर, कदीर मुजावर, शफीक मुजावर, शहीजद मुजावर, असलम मुजावर, आदील मुजावर, नासीर मुजावर यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. सदर होळी सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष शेख समद अब्दूल समद यांच्या मार्गदर्शनात पेटविण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे सदस्य डॉ.अशपाक व संपूर्ण टीम तसेच बुलढाणा तहसिलदार रुपेश खंडारे, अप्पर पोलिस अधिक्षक बी. बी.महामुनी, गटविकास अधिकारी मनिषा पवार, रायपूर ठाणेदार राजवंत आठवले, ग्रामविस्तार अधिकारी गवते तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सैलानी येथे होळीचे दर्शन घेण्यासाठी जवळपास ४ ते ५ लाख भाविकभक्त उपस्थित असल्याची अंदाज आहे. होळीसाठी जेसीबीने मोठा गड्डा तयार करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २ अग्नीशमक दलाच्या गाड्या, दोन जेसीबी तसेच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक भक्त होळीचे दर्शन घेवून आपल्या गावी परतात. सैलानी येथे १२ मार्च रोजी निघणाऱ्या संदलचे दर्शन घेण्यासाठी जवळपास ५० ते ७५ हजार भाविकांनी राहुट्या बांधल्या आहेत.

  • देशभरातून भाविकांची हजेरी..
    महाराष्ट्रासह देशभरातून सैलानी बाबा येथील होळीचे दर्शन घेण्यासाठी मोठी हजेरी लावली. तीन वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने सैलानी यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी भाविकांनी लाखोच्या संख्येने हजेरी लावीत होळीचे दर्शन घेतले. ही होळी पाच दिवस जळत असते. भाविक होळीत भाविकांच्या अंगावरुन ओवाळून टाकल्यामुळे मनोरुग्णाच्या अंगातील भूत नाहीसे होतात, असा भाविकांचा समज आहे.
  • वातावरणामुळे धंद्यावर परिणाम होण्याची शक्यता..
    सोमवार 6 मार्च रेाजी सकाळी सैलानीसह परिसरामध्ये काही ठिकाणी वाऱ्या उधाणासह पावसाने हजेरी लावल्याने चित्रपट टॉकीज, आकाश पाळणे, मौत का कुवा, हॉटेल कोल्ड्रिंक्स, फुल भंडारचे दुकान, किराणा दुकान व हातगाड्यावरील लागले आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे धंद्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे