घरपट्टी व नळपट्टीचे बिले भरणाऱ्या उमेदवारांना प्रथम पसंदी? मोताळा शहरात चर्चांना आले उधाण !

378

सन 2026 ची मोताळा नगर पंचायत निवडणूक होणार महागडी ?

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (28 Mar.2023) मोताळा नगर पंचायतची निवडणूक सन 2021 मध्ये दोन टप्प्यात घेण्यात आली. ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती, कारणही तेवढेच मोठे ‘आर्थिक’ होते, निवडणुकीत लाखो रुपयांचा चुराडा झाला होता. कुठे एकमत 5 हजार, कुठे 6 व 7 हजार रुपये दिल्याच्या चर्चांना त्यावेळी मोठा उत आला होता. दरम्यान एका पक्षाचा एक दिग्गज नेता म्हणाला होता, आमच्या शहरात 500 ते 1000 रुपयांच्यावर कोणालाच दिले नाही, असे सांगत मोताळ्याचा खर्च पाहून तो नेताही ‘शॉट’ झाला होता. आतातर सन 2026 च्या नगर पंचायतच्या निवडणुकीत थकीत घरपट्टी व नळपट्टी जो भरेल त्यालाच मतदान करण्याच्या चर्चांना मोठा उत आलाय..! त्याला कारणही कदाचीत तेवढेच मोठे आहे. सध्या मोताळ्यात घरपट्टी व नळपट्टी न भरणाऱ्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने सन 2021 च्या निवडणुकीपेक्षा 2026 ची निवडणूक महागडी होण्याची शक्यता सुज्ज्ञ जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

सन 2015 मध्ये मोताळा नगर पंचायतची स्थापना होवून आज जवळपास 8 वर्ष पुर्ण झाली आहे. असे असतांना सुध्दा मोताळा शहराचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. नगर पंचायत झाली तेंव्हापासून रंगरंगोटीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. असे असतांना सुध्दा स्थापना केंव्हा झाली, हे नगर पंचायतच्या दर्शनी ठिकाणी पेंटींग केलेले नाही, विशेष! मोताळा नगर पंचायतकडून काही दिवसापुर्वी मिळालेल्या माहितीनुसार नगर पंचायतीची सन 2022-23 मध्ये मालमत्ता कर 78 लक्ष 83 हजार 936 रुपये तर पाणीपट्टीकर 69 लक्ष 71 हजार 619 रुपये एवढा थकीत होता, त्यापैकी मालमत्ता कर 9 लक्ष 44 हजार 500 रुपये वसुली करण्यात आला तर नळपट्टी कर 6 लक्ष 91 हजार 330 रुपये वसूल करण्यात आला आहे. मालमत्ता कराची वसूली 11.98 टक्के तर नळपट्टीची वसुली 9.92 टक्के वसुली झाल्याची माहिती नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने देण्यात आली असून ही माहिती 28 फेब्रुवारी पर्यंतची आहे. आता करोडोचा उर्वरीत नळपट्टी व पाणीपट्टी कर नगर पंचायत नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करुन 31 मार्चपर्यंत कसा वसूल करेल, हे एक अनाकलनीय कोडेच आहे.

पाणीकर न भरल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. तर जे नागरिक पाणीपट्टी व मालमत्ता कर भरीत आहे, त्यांना नगर पंचायत मोताळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. बिल भरणाऱ्यांना पाणी पुरवठा होत असल्याने ते आनंदी झाले आहेत, तर ज्यांच्याकडे हजारो रुपये पाणी व मालमत्ता कर बाकी आहेत, ते भरु शकत नसल्यामुळे त्यांना मात्र पाणी पुरवठ्यापासून वंचित रहावे लागत आहे. शहरातील नागरिकांकडे वर्षानुवर्ष थकीत करोडो रुपयांचा कर बाकी असतांना त्यांचा पाणी पुरवठा यापुर्वी कधीही बंद करण्यात आला नव्हता, त्यावेळी मोताळा नगर पंचायतच्या कराकडे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन मोताळा नगर पंचायत मुख्याधिकारी यांना सक्तीचे कर वसुलीचे आदेश दिले नसल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत चालू होता, असे म्हणायला हरकत नाही.

सन 2026 मध्ये लोकशाही की ‘आर्थिक’शाही ?

शहरातील थकीत करदात्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने त्यांना मोठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागत आहे. निवडून देण्यासाठी पैसा घेतला, दारु पिली आठ दिवस मटन,चिकन खाल्ले, मजा मारली, म्हणून आता भोगावे लागत असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा असून अनेक ठिकाणी काही नागरिक आता सन 2026 च्या मोताळा नगर पंचायतच्या निवडणुकीत नाही 5 हजार रुपये, नाही मटन, नाही चिकन, नाही दारु जो भरीन 5 वर्षाचा पाणीकर व मालमत्ता कर त्यांचेच दाबू बटन, अश्या चर्चा मोताळा शहरात रंगू लागल्याने पुढील पंचवार्षीक निवडणूकीसाठी इच्छुकांना 35 ते 40 लाखापेक्षाही जास्त खर्च करावा लागेल, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही!