ट्रॅक्टरचे चाक अंगावरुन गेल्याने 16 वर्षीय युवकाचा मृत्यू !

772

चालकाला रायपूर पोलिसांनी केली अटक

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (10.JUNE.2023) चालू ट्रॅक्टरवरुन पडल्याने अंगावरुन चाक गेल्याने एका सोळावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना 9 जूनच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास मातला रायपूर रस्त्यावर घडली. मृतक मुलाचे नाव विश्वजीत भगवान गायकवाड असे असून तो पळसखेड भट येथील आहे. ट्रॅक्टर चालकावर रायपूर पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान गायकवाड यांनी रायपूर पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन चिंचोले रा.पळसखेड भट यांच्या ट्रॅक्टरवर विश्वजीत गायकवाड (वय 16) हा चालकाच्या बाजुने बसलेला होता. चालक विशाल मुरलीधर फौलाने (वय 24) रा.रायपूर याने मातला रायपूर रस्त्यावर रायपूर गावाजवळ निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून अचानक ब्रेक दाबल्यामुळे विश्वजीत गायकवाड हा खाली पडला, यावेळी त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले, अशा मृतकाचे वडील भगवान चिंतामण गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन रायपूर पोस्टे.ला ट्रॅक्टर चालक विशाल मुरलीधर फौलाने याच्यावर भादंवीचे कलम 279, 338, 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. ठाणेदार राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली एअसआय. यशवंतराव गवई पुढील तपास करीत आहे.

विश्वजीतने दहावीची मार्कशीटही पाहिली नाही..

विश्वजीत गायकवाड याने यावर्षी दहावीच्या परिक्षेत 75 टक्के गूण घेवून पास झाला होता. तो पिंपळगाव सराई जनता विद्यालयांमध्ये शिकत होता. त्याने त्याची दहावीची मार्कशीटही पाहिली नव्हती.