सिंहललकार स्व. अण्णासाहेब पाटील येरळीकर यांचे स्मारक रखडले !

522

शोकांतिका: राजकारणात मराठ्यांचे खंडीभर नेते; एकही पुढे येईना !

गणेश निकम, केळवदकर
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (11.JUNE.2023) मराठा महासंघ या दोन अक्षरांना समाजाभिमुख करून बारा बलुतेदारांना सोबत घेत स्व.अण्णासाहेब पाटील येरळीकर ता.नांदुरा यांनी समाजाला वैचारिक दिशा दिली. त्यांच्या तालमीत तयार झालेले जिल्ह्यातील अनेक नेते सद्या सत्तेच्या शीर्ष स्थानी आज बसले असले तरी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाचा मुद्दा मात्र दुर्लक्षित आहे. त्यांच्या जन्म गावी किंवा नांदुरा येथे त्यांचे स्मारक व्हावे अशी आस मराठा समाजाला आहे. मात्र हा मुद्दा केव्हा व कोण हाती घेणार ? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईमध्ये मराठा तरुण नोकरी शोधण्यासाठी जायचा तेव्हा प्रथम त्याची सुरुवात कामगार म्हणून व्हायची अशा कामगारांच्या अनंत अडचणी व व्यथा पाहून पश्चिम महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी संघटना उभी केली. 1980- 81 मध्ये त्यांनी मराठा समाजाचे प्रश्न हाती घेऊन “मराठा महासंघ” उभा केला. शिवसेना कुठेच नसताना त्याकाळी मराठा महासंघ चांगलाच ‘पावरफुल’ होता. 1981 च्या दरम्यान अण्णासाहेब पाटील बुलढाण्यात आले तेव्हा त्यांच्या भाषणाने नांदुरा तालुक्यातील येरळी येथील तरुण अण्णासाहेब पाटील येरळीकर प्रभावित झाले. (योगायोग दोन्ही नेत्यांची नावे अण्णासाहेब अशीच आहेत) नांदुरात अण्णासाहेब, बुलढाणा येथे ना. जा. दांडगे, गुलाबराव खेडेकर, अण्णासाहेब पडघान, दिलीपराव रहाटे, श्रीराम बाळाजी आदींनी ही चळवळ पुढे नेली. तर हल्ली खासदार असणारे प्रतापराव जाधव, माजी मंत्री गुलाबराव गावंडे आदी अण्णा साहेबांच्या तत्कालीन चळवळीत सक्रिय होते. टी.डी.अंभोरे, जाधव सर अशी अनेक नावे सांगता येतात.

मराठा समाजाची वैचारिक मशागतच या नेत्यांनी केली असे म्हणता येते. मराठा महासंघाचे संस्थापक माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांची भेट घेऊन समाजाच्या काही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या त्या शिष्टमंडळामध्ये बुलढाण्यातून अण्णासाहेब पाटील येरळीकर सामील झाले होते. मुंबईत हाजी मस्तान या नावाची प्रचंड दहशत त्याकाळी होती. हे नाव उच्चारले तरी भलेभले चाळा चाळा कापायचे अशा वेळी मुंबई येथे सभा घेत येरळीकरांनी हाजी मस्तानाला दम भरला. भीमशक्ती शिवशक्ती हा अफलातून प्रयोग त्यांनी जिल्ह्यात राबवला दरम्यान त्यांचे निधन झाले.

त्यावेळी 15 हजाराचा जमाव सभेसाठी यायचा..!

इतिहासाचे गाढे अभ्यासक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील येरळीकर फर्ड वक्ते होते. विदर्भात बोलणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. सिंह गुरगुरावा तसा धीर गंभीर आवाज अंगावर रोमांच उभा करून जाई. त्यामुळे अण्णा साहेबांना सिंह ललकार ही बिरुदावली लागली. मराठा महासंघाचे राज्य कारणीमध्ये ते सदस्य होते. मराठा समाजाचे प्रश्न, शेतकरी प्रश्न व वेगळा विदर्भ अण्णा साहेबांचे भाषणाचे आवडते विषय. अण्णा साहेबांची सभा असली म्हणजे दहा-पंधरा हजारांचा जमाव त्या काळी सहज जमत असे, एवढे ते लोकप्रिय होते.

जिल्ह्यातील कर्त्या सवरत्या राजकीय नेत्यांचेही दुर्लक्षच !

अण्णासाहेबांचे स्मारक व्हावे या साठी काही नेते पुढे सरसावले होते.पण पुढे त्यांना विसर पडला. हा मुद्दा राजकीय उदासीनतेमुळे आजही रखडलेला आहे. समाजाला ऊर्जा देणारे माणसं दुर्मिळ असतात अशा माणसा मुळे समाजाला प्रेरणा मिळते. ताराबाई शिंदे ,पंढरीनाथ पाटील यांनी देखील हेच काम केले आहे. ताराबाईंचा मुद्दा आजही तसाच दुर्लक्षित आहेत जसा अण्णासाहेब पाटील येरळीकर यांच्या स्मारकाचा आहे . राज्यात अनेकांचे स्मारके आहेत मात्र अण्णा साहेबांचे स्मारक रखडले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांच्या हाती राजकीय सूत्रे असताना व अण्णासाहेबांच्या तालमीत तयार झालेले राजकीय नेते सध्या जिल्ह्याचे करते सवरते असताना स्मारकांचा मुद्दा दुर्लक्षीत आहे, हे विशेष!

स्मारकासाठी प्रयत्नशील- जवंजाळ पाटील

अण्णासाहेब पाटील येरळीकर यांनी समाजाला ऊर्जा दिली. त्यांचे स्मारक नांदुरा येथे किंवा त्यांचे जन्म गावी झाले पाहिजे ही समाज भावना आहे.तदवतच आद्य लेखिका ताराबाई सिंदे यांचे बुलडाणा येथे स्मारक असावे यासाठी समाज धुरीणांनी व सर्व नेत्यांनी पुढे यावे असे आवाहन मराठा समाजाचे नेते सुनील जवंजाळ पाटील यांनी केले आहे.केवळ मराठा समाजच नव्हे तर सर्वच घटकांसाठी झटणाऱ्या या नेत्यांच्या आठवणी आपण जपल्या पाहिजे असेही जावंजाळ म्हणाले.