भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या न्यायासाठी समता संघटनेची आझाद मैदानावर धडक!

410

 500 महिला व पुरुषांनी उपसले थंडीत आमरण उपोषणाचे हत्यार!

Buldhana News Update

मुंबई – 27 November 2022 (BNUन्यूज)

 उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गायरान अतिक्रमण धारकांच्या ताब्यातील जमिनी निष्कासन करण्याच्या आदेशास सरकारने न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करुन निष्कासनाच्या कारवाईस तात्काळ स्थगिती देण्यात यावी, भूमिहीन गायरान अतिक्रमण धारकांच्या बाबतीत सरकारने धोरणात्मक निर्णय यासह आदी मागण्यांसाठी 21 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करीत संविधान दिनी 26 नोव्हेंबर रोजी मुंबई (Mumbai) येथील आझाद मैदानावर (Azad Maidan) समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गवई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष विजय दोडे यांच्या नेतृत्वात 150 महिला व 350 पुरुषांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशाने (High Court) शासन स्तरावरून प्रशासनाला गायरान जमीनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. ही कारवाई भुमीहीन, गरीब जमीनी विकत घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांसाठी अन्यायकारक करणारी आहे. भूमीहीन, गोरगरीब, एसटी. ओबीसी भटक्या लोकांनी निवासी प्रयोजनासाठी व कृषी प्रयोजनासाठी गायरान जमीनीवर अतिक्रमण केले आहेत. सदर जमीनी जर सरकारने ताब्यात घेतल्या तर हजारो कुटूंब बेघर व उपजिवीकेपासून वंचित होणार असून दुदैवाने त्यांचेवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने या कारवाईस तात्काळ स्थगिती देवून सरकारने मा.न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करुन सदर अतिक्रमणे नियमानुसार करण्यात यावी, जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित असलेले वनहक्क दावे मंजूर करुन तात्काळ वनपट्टे वाटप करावे या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 350 अतिक्रमण धारक पुरुष व 150 महिलांनी समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गवई व जिल्हाध्यक्ष विजय दोडे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणामध्ये गजानन जाधव, भारतभाऊ पैठणे, रमेश गवई, समाधान अवचार, रुपेश जाधव, विलास शेगोकार, एकनाथ तोडे, एकनाथ हिवाळे, साहेबराव सपकाळ, ज्ञानेश्वर बावस्कार, हिंमत जाधव, सुशीलाबाई जाधव, बाळु जाधव, शोभाबाई शेजव, पदमाबाई जाधव, सिंधुबाई हिवाळे, कावेरी मस्के, लक्ष्मी जाधव, मनिषा गालट, लिलाबाई यंगड यांच्या 350 पुरुष व 150 महिला सहभागी झाल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशीही या उपोषणाची दखल घेण्यात आली नसल्याने सदर उपोषण आज 27 नोव्हेंबर रोजी सुध्दा सुरुच आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना 21 नोव्हेंबर रोजी देण्यात आला होता इशारा..

भूमिहीन अतिक्रमण धारकांवरील कार्यवाही न थांबवल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आम्रपाल वाघमारे (Amrapal waghamare) यांनी प्रशासनास दिला होता, परंतु जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्याने आझाद मैदान येथे मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवण्याचा आक्रमक पवित्रा समता संस्थापक अध्यक्ष नितीन गवई व जिल्हाध्यक्ष विजय दोडे यांनी घेतला असून तसे त्यांनी ‘बुलडाणा न्यूज अपडेट’शी बोलतांना सांगितले.