जिल्ह्यात खुलेआम होते गुटखा विक्री; अन्न व औषध प्रशासन करते तरी काय? मलकापूर पोलिसांनी कंटेनरमधून पकडला 1 करोड रुपयांचा गुटखा!

57

BNU न्यूज नेटवर्क
मलकापूर (20 Sep.2023 ) राज्यामध्ये शासनाने गुटखा प्रतिबंधीत केलेला आहे, तो फक्त नावापुरताच आहे. जिल्ह्यात आजरोजी सर्वीकडे खुलेआम गुटखा माफीया गुटख्याचा माल पुरवित असल्याने गुटखा खाणाऱ्यांची संख्या वाढत असून तो दुपटीने मिळत असल्याने खाण्याची मजा काही औरच असल्याची प्रतिक्रीया गुटखा खाणारे तरुण देतात. गुटखा विक्रीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असून त्यांचे फक्त इतर स्त्रोतातून मलिदा लाटण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र, आज 20 सप्टेंबर रोजी मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी देवराव गवळी साहेब, ॲक्शन मोडवर येत त्यांनी खालसा ढाबा नॅशनल हायवे रोड, मलकापूर येथे नागालँण्ड येथील कंटेनर पकडून त्यातून जवळपास 76 लक्ष 80 हजार रुपयांचा गुटखा सुगंधीत तंबाखू व 30 लक्ष रुपये किमतीचे कंटेनर असा एकूण 1 करोड 6 लक्ष 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहे.

मलकापूर उपविभागीय पोलीस देवराव गवळी यांना मलकापूर हायवेवर एका कंटेनर मधून लाखो रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीवरुन पथक तयार करुन 20 सप्टेंबरच्या दुपारी 1.30 वाजेच्या नॅशनल हायवे मलकापूर रोडवरील खालसा ढाबा उभ्या असलेल्या कंटेनर क्र.एन.एल.01-एन-5196 ट्रक आढळून आल्याने पोलिसांनी ढाबा मालकास चालकाबाबत विचारणा केली असता, चालक निघून गेल्याचे सांगितले. पोलिस पथकाने कंटेनरची पाहणी करीत त्यामधून राजनिवास पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा माल 160 प्लास्टीक मधील 61 लक्ष 44 हजाराचा गुटखा व दुसऱ्या गोण्यातून 15 लक्ष 36 हजार रुपयांचा गुटखा व कंटेनर 30 लक्ष असा एकूण 1 कोटी 6 लक्ष 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई

सदर कारवाई उपविभागीय कार्यालयाचे पोउपनिरीक्षक श्रीकांत विखे, सहाय्यक फौजदार भगवान मुंढे, पोहेकॉ.प्रकाश कोळी, पोकाँ.संदीप खोमने, अल्पेश फिरके, सचिन कवळे, तमखणे, चालक पोहेकाँ.गणेश सावे, सपोनी.करुणाशील तायडे, पोकाँ.प्रमोद राठोड, पोकाँ.ईश्वर वाघ,पोकाँ.शेख आसीफ, पोकाँ.संतोष कुमावत यांच्या पथकाने जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे, अप्पर पोलिस अधिक्षक देवराव गवळी, शहर पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

कंटेनर चालक मात्र फरार..

मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने शासनाने प्रतिबंधीत केलेला जवळपास 1 करोड रुपयांचा गुटखा पकडला. पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र, पोलिसांच्या नेटवर्कपेक्षा गुटखा माफीयांचे नेटवर्क पावरफुल्लचं असल्याने कंटेनर चालक पोलिस घटनास्थळी पोहचण्यापुर्वीच तेथून पळून गेला होता, हे विशेष !