अंमली पदार्थ विरोधात एकत्रित कारवाई करावी-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

82
????????????????????????????????????

बुलढाणा(3-Oct.2023 शासकीय बातमी)अंमली पदार्थांच्या आहारी प्रामुख्याने युवा वर्ग जात आहे. यामुळे एक पिढीचे नुकसान होणार आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने गांजाविरोधात कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे समाजातील विविध घटकांवर परिणाम होत असल्याने याविरोधात एकत्रित कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आज, दि. 3 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांच्यासह अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी गेल्या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईची माहिती घेतली. जिल्ह्यात गांजा व्यतिरिक्त इतर अंमली पदार्थांची माहिती घेतली. जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात गांजाची शेती होत असल्यास कृषि विभागाने याबाबत पोलिस विभागाला माहिती द्यावी. शंका आल्यास पोलिस आणि कृषि विभागाने याबाबत वारंवार पाहणी करावी. गांजाची वाहतूक रोखण्यासाठी इतर राज्य आणि जिल्ह्यातून येणारे रस्त्यावर तपासणी नाके उभारण्यात यावे. शहरी भागात दाटीवाटीच्या वस्तीमध्ये अंमली पदार्थ आढळून आले आहे. त्यामुळे या भागावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. अंमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी प्रामुख्याने निर्जन स्थळे, बगीचे शोधले जातात. याठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी. अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण विद्यार्थी वर्गात जादा आहे. त्यामुळे शाळा किंवा महाविद्यालयाच्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी. शाळा परिसरात विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्याजवळ पदार्थ आढळत असल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी. अंमली पदार्थ सेवन केलेले विद्यार्थी आढळून असल्यास त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन अंमली पदार्थ मिळण्याच्या ठिकाणाची माहिती घ्यावी.

अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करावी. प्रामुख्याने विद्यार्थी आणि युवा वर्ग यामध्ये व्यवसनाधिन होणार नाही, यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांची एकत्रितरित्या बैठक घेण्यात येईल. यातून अंमली पदार्थ विरोधात कारवाई करणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.