जिल्ह्यातील जि.प.शाळेत उद्यापासून गुंजणार विद्यार्थ्यांची किलबिलाट

32

शिक्षण विभाग सज्ज: पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे होणार स्वागत

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (29.JUNE.2023) मे व जून महिन्याच्या जवळपास 60 दिवसाच्या सुट्टयानंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थ्यांची किलबिलाट गुंजणार आहे. शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सज्ज झाले असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके व 1 लाख 44 हजार 137 विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे, त्यासाठी शासनस्तरावरुन शिक्षण विभागाला 4 कोटी 32 लक्ष 41 हजार रुपये मिळाले आहे.

उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शुक्रवार 30 जून रोजी नविन शैक्षणीक सत्र 2023-24 ला सुरुवात होणार आहे. शालेय व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या बालकांचा पोलिस पाटील, सरपंच व ज्येष्ठ नागरिक यांच्याहस्ते गुलाब पुष्प व मिठाई देवून स्वागत करण्यात येणार आहे. 100 टक्के उपस्थितीसह प्रत्यक्ष वर्गाध्यपनास जिल्ह्यातील तेराही तालुक्यात प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना 2 गणवेशासाठी 600 रुपये देण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी एक ड्रेससाठी ४ कोटी ३२ लक्ष ४१ हजार रुपये मिळाले असल्याने जिल्ह्यातील ८९ हजार १९४ मुली, अनुसूचित जाती मुले २० हजार १५३ तर अनुसूचित जमाती मुले ६ हजार २२७ विद्यार्थी व दारीद्र्य रेषेखालील मुले २८ हजार ५६३ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रति विद्यार्थी एक गणवेश व पुस्तके मिळणार आहे. याचे नियोजन मुख्याध्यापक करणार आहे, यासाठी 4 कोटी 32 लक्ष 41 हजार रुपये मिळाले आहे. दुसऱ्या गणवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.