शिंदे सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 150 कोटी मंजूर !

74

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (4.Oct.2023) राज्यात यंदा जून-जुलै या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतपीक, शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले होते. बुलढाणा जिल्ह्यात 18 ते 20 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे 4 तालुक्यातील 244 गावे बाधित होवून 1 लक्ष 48 हजार 423 शेतकऱ्यांचे 2 हेक्टर पर्यंतचे 134607.58 क्षेत्र बाधीत झाले होते, यासाठी 115 कोटी 40 लक्ष 982 रुपये तर 134607.58 हेक्टर क्षेत्रासाठी 35 कोटी 41 लक्ष 87 हजार असे एकूण 150 कोटी 81 लक्ष 87 हजार 982 रुपयांची मदत शिंदे सरकारने जाहीर केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात 18 ते 20 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्यातील 78 गावे, शेगाव तालुक्यातील 77, नांदुरा तालुक्यातील 72 तर जळगाव जामोद तालुक्यातील 17 गावांना तडाखा बसला होता. यामध्ये 1 लक्ष 48 हजार 423 शेतकऱ्यांचे 2 हेक्टरपर्यंत 134607.58 एवढे क्षेत्र बाधित झाले होते. तर 12902.05 हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्राचे नुकसान झाले होते. यामध्ये शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद पिकांचे मोठ्या नुकसान झाले होते. नदीकाढच्या गावामधील शेती प्रभावित होवून त्यामध्ये पाणी साचून काही ठिकाणी शेती खरडून गेली होती. सदर नुकसानीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी दिल्याने महसूल प्रशासनाने शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर केला होता. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपोटी 150 कोटी 81 लक्ष 87 हजार 982 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ती डीबीटी प्रणालीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.