राणा चंदनला प्रथम पुण्यस्मरणदिनी रक्तदानातून देणार श्रद्धांजली; रविवारी स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर बुलढाणा येथे रक्तदान शिबिर

144

बुलढाणा (BNU न्यूज)- शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी रात्री-अपरात्री आवाज द्या तुम्ही हजर आम्ही, अश्या राणा चंदनला जावून एक वर्ष पुर्ण झाले. रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करणारा एक झुंझार कार्यकर्ता म्हणून स्व.राणाजी चंदन यांचे नाव आजही घेतले जाते. राणा चंदन यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदशनाखाली रविवार ११ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी राणा एक विश्वासाच ठिकाण होतं. राणा चंदन एकप्रकारची चालती बोलती रक्तपेढीच होती. एखाद्या रुग्णांला रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी राणा शासकीय रुग्णालय किंवा खासगी रक्तपेढीत गेले नाही, असा एकही दिवस उजाडत नसे. रक्तदान करण्यासाठी युवकांना प्रोत्साहीत करण्याची राणा यांच्याकडे एक कला होती. राणाच्या एका आवाजात दहा जण रक्त देण्यासाठी धाऊन यायचे, परंतु दुर्दैवाने काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले. राणाला जावून आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी रक्तदान करुन खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कृतीतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर, बुलढाणा येथे रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थीनी, युवक-युवती, शहरी नागरिक, शेतकरी व कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, स्व.राणा चंदन यांना आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.