राजूर घाटात मोठी दुर्घटना टळली ; चालकाने बस दरीमध्ये जाता-जाता वाचविली !

84

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (9.Oct.2023) एकीकडे एसटी.महामंडळ प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याचा डांगोरा पिटते, तर दुसरीकडे भंगार (ST.BUS)बसेस मधून प्रवाश्यांसह चालक व वाहकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. असाच एक अंगावर शहारे आणणारा प्रकार सोमवार 9 ऑक्टोबर रोजी राजुर घाटात रात्री 8 वाजेच्या सुमारास घडला. कारण बसचे अचानक ब्रेक फेल झाले होते. परंतु चालक दिपक वडगावर यांनी समय सूचकता दाखवित बसला हनुमान मंदीराजवळील वळणावर दरीत कोसळता, कोसळता वाचवित प्रवाशांचे प्राण वाचविले. परंतु तीन प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मलकापूर आगाराची क्र.एम.एच-40 एन-8171 ही बस जिल्हा मुख्यालय बुलढाणा बसस्थानकातून सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास चालक दिपक वडगावकर घेवून मलकापूरकडे जाण्यासाठी निघाले होते. राजुर घाटात बसचे ब्रेक फेल झाल्याची बाब लक्षात येताच हनुमान मंदीराजवळ चालकाने गाडीच्या ब्रेकवर उभे राहून गाडी थांबविण्याचा प्रयत्न करीत गाडी मंदीराच्या डाव्या साईडच्या खड्डयात टाकल्याने बसमधील 6 जणांचे प्राण वाचले. जर बस हनुमान मंदीराजवळील उजव्या बाजुच्या दरीत कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. बस खड्डयात गेल्यामुळे 4 प्रवाशांपैकी 3 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती वाहक बुंदे यांनी ‘बुलडाणा न्यूज अपडेट’शी बोलतांना दिली. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोस्टे.चे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल होवून त्यांनी वाहतूक सुरुळीत केली. याबाबत शहर पोस्टे.ला वृत्तलिहेपर्यंत तक्रार दाखल नव्हती.

बिचाऱ्या चालक वाहकांचा काय दोष ?

सध्या एसटी.महामंडळाच्या बसेसचा केव्हा अपघात होईल, त्या कुठे बंद पडतील, याचा नेम राहिलेला नाही. शिंदे सरकारच्या 75 वर्षावरील नागरिकांना फुकट, 65 वर्षावरील नागरिक व महिलांना अर्धे टिकीट केल्याने लालपरीला ‘अच्छे दिन’ आले आहे. परंतु भंगार व नादुरुस्त बसेसमुळे राजुर घाटात भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बसचे ब्रेक फेल होतात, बस बंद पडते यामध्ये चालक-वाहकांचा काय दोष? असा प्रश्न सुज्ञ प्रवाशी उपस्थित करीत शासनाच्या ढिसाळ नियोजनाचा रोष व्यक्त करीत आहे.