स्थानिक गुन्हा शाखेची सर्वात मोठी कारवाई ! आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांचे रॅकेट पकडले 42 दुचाकीसह 21 लाखाचा मुद्देमाल जप्त !!

74

बुलढाणा- स्थानिक गुन्हा शाखा अ‍ॅक्शन मोडवर येत आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 42 दुचाकीसह 21 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही सर्वात मोठी कारवाई असून चोरट्यांपेक्षा पोलिसांचे नेटवर्क पावरफुल्ल असल्याचा प्रत्येय पोलिसांना दिला आहे. सदर धडक कारवाई आज 20 डिसेंबर रोजी करण्यात आली.

जिल्ह्यात दिवसेनदिवस दुचाकी चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सदर अज्ञात चोरट्यांचा शोध लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. स्थागुशाने आपले नेटवर्क सक्रीय करीत 15 डिसेंबर रोजी शत्रुघ्न रामचंद्र सोळंके रा.जळगाव जामोद ह.मु.रिधोरा ता.मोताळा याला ताब्यात घेवून त्याला पोलिसी खाक्या दाखविताच पोलिसांनी त्याचा साथीदार गंगाराम इकराम पावरा (वय 20) रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, तुळशीराम इकराम पावरा (वय 24)रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, सिताराम लेदा मुझाल्दे (वय 24 ) रा. शिरवेल महादेव ता. भगवानपुरा जि. खरगोन मध्यप्रदेश या चोरट्यांकडून 42 दुचाकीसह 21 लाखाचा मुद्देमाल जप्त करुन त्यांना अटक केली. चोरट्यांना जळगाव जामोद पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने शत्रुघ्न सोळंके, गंगाराम पावरा, तुळशीराम पावरा यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी तर सिताराम मुझाल्दे यास अटक करण्यात आली.

निर्जनस्थळी उभ्या दुचाकी चोरायचे

पोलिसांनी विविध कंपनीच्या 21 लक्ष रुपयांच्या 42 दुचाकी जप्त केल्या. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 6 दुचाकी, जळगाव जिल्ह्यातील 9, नाशिक जिल्ह्यातील 4, मध्यप्रदेश राज्यातील 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या. हे अट्टल चोरटे निर्जनस्थळी पार्कींग केलेल्या मोटार सायकल बाहेर राज्यात चोरी करुन महाराष्ट्रामध्ये विक्री करीत होते.

यांनी केली कारवाई

सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे, अपर पोलिस अधिक्षक खामगाव अशोक थोरात, बुलढाणा अपर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा.प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, श्रीकांत जिंदमवार, पोलिस अंमलदार रामविजय राजपूत, दशरथा जुमडे, दिपक लेकुरवाळे, दिंगाबर कपाटे, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, अनंत फरतडे, दिपक वायाळ, मनोज खर्डे, चालक पोकॉ.विलास भोसले, सुरेश भिसे, सायबर पोस्टे.चे राजु आडवे, अमोल तरमळे, संदीप शेळके व योगेश सरोदे यांनी केली.

संशयास्पद दुचाकी खरेदी करु नये !

दुचाकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये पार्क करावी. व्हील लॉकचा वापर करावा. कोणी विना कागदपत्राची गाडी विक्री करीत असल्यास ती खरेदी किंवा गहाण ठेवू नये. संशयास्पद वाटणाऱ्या इसम व त्याच्या ताब्यातील दुचाकीबाबत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा फोन नं. 07262-242738 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.