मुलीला आणले म्हणत आठ जणांनी केले 22 वर्षीय तरुणाचे अपहरण! प्रेम प्रकरणातून प्रकार घडल्याची चर्चा

173

यवतमाळ (BNU न्यूज)- यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील ब्रम्ही गावातील एका तरुणाला अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथील 8 जणांनी संगनमत करून अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणाच्या आईच्या फिर्यादीवरुन पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

फिर्यादी वैजंताबाई लोखंडे (वय ५०) रा. ब्रम्ही ता. महागाव यांनी 12 सप्टेंबर रोजी पुसद ग्रामीण पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैजंताबाई यांना पाच मुले आहेत. सर्वात मोठा मुलगा ज्ञानेश्वर तर सर्वात लहान मुलगा पांडुरंग आहे. ते दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथे उदरनिर्वाहासाठी पाच ते सहा वर्षांपासून वास्तव्यास होते. फिर्यादीचा २२ वर्षीय लहान मुलगा पांडुरंग अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथे राहून ड्रायव्हिंगचे काम करत होता. सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी वैजंताबाई यांचा मोठा मुलगा ज्ञानेश्वर व त्याची पत्नी ब्राह्मी गावात परत आले होते. त्यानंतर पांडुरंग हा गव्हाणवाडी येथे एका तरुणीला घेऊन आला. ते दोघेही ब्रह्मी गावातच गेल्या दहा ते बारा दिवसापासून राहत होते. दोघांनाही लग्न करायचे आहे म्हणून पांडुरंगाच्या आईला सांगितले. घटनेच्या दिवशी १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथे राहणारे कैलास ब्राह्मणे हा आरोपी रमेश गव्हाणे, संजय गव्हाणे, दीपक गव्हाणे, संजय पवार, अमोल पवार, अंकुश पवार व गोरख पवार सात आरोपींना सोबत घेऊन त्यांच्या मुलीला पळवून आणल्याचा आरोप करीत भेटण्यासाठी आले. आरोपींनी संगनमत करून मुलीला कसे काय आणले, असा जाब विचारीत वाद निर्माण करुन आरोपींनी संगनमत करून पांडुरंगसह मुलीला घेऊन वाहनात टाकून पसार झाले. याप्रकरणी वैजंताबाईच्या फिर्यादीवरुन उपरोक्त आठ विरोधात पुसद ग्रामीण पोस्टे.ला भादंवीचे कलम 365 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहे.