शेतकऱ्यांच्या ‘एल्गार’ मोर्चाने बुलडाणा शहर दणाणले..! आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास अख्या महाराष्ट्राला हादरुन सोडू : रविकांत तुपकर

188

बुलढाणा(BNUन्यूज) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची फौज बुलढाण्यात धडकली. शेतकरी आंदोलनातील गर्दीचे आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढत रेकॉर्ड ब्रेक मोर्चाने संपूर्ण बुलढाणा शहर दणाणून गेले होते. मोर्चा म्हणजे शेतकरी आंदोलनाचा शेवट नसून आजपासून खऱ्या अर्थाने लढाईला सुरुवात झाली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करावा. सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेटम आम्ही देत असून त्यानंतर संपूर्ण राज्यभर आंदोलन पेटवून महाराष्ट्र हादरुन सोडू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

पुढे रविकांत तुपकर यांनी भीक मागण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांचा हक्क मागण्यासाठी, बळीराजाच्या घामाचे दाम मागण्यासाठी ही हक्काची लढाई आहे. राज्यात ऊस उत्पादक शेतकरी ९ टक्के तर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ६८ टक्के आहे. ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करुन त्यांचा भाव मिळवून घेतात आता विदर्भ- मराठवाड्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ताकद दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी हा एल्गार पुकारल्याचे सांगितले. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे त्यामुळे भविष्यात आमदार, खासदारच काय कोणतेच पद मिळाले नाही तरी चालेल परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहण्याची ग्वाही देत त्यांनी सत्तेच्या मोहात आजवर कधीच पडलो नाही, यापुढेही कोणताच मोह शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून मला वेगळे करु शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. आयात – निर्यात धोरण आणि सोयाबीन-कापसाचे भाव याबाबतची अभ्यासपूर्ण मांडणी यावेळी रविकांत तुपकर यांनी केली.

सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च सहा हजारापर्यंत आहे तर सध्या भाव ४ हजारापर्यत आहे, कापसाला क्विंटलमागे साडे आठ हजार उत्पादन खर्च आणि सध्याचे भाव 6 ते 7 हजारापर्यंत आहेत. यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरुन निघणार नाही. त्यातच अतिवृष्टी व सततच्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव स्थीर रहावा यासाठी सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन देण्यात यावे, मागील वर्षी आयात केलेल्या ५ लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी, सोयापेंड आयात करु नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी, खाद्य तेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवावे, कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, पिककर्जासाठी सीबीलची अट रद्द करावी, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कर्जात वळती करु नये आदी मागण्या यावेळी रविकांत तुपकर यांनी मांडल्या. सुरुवातीला विक्रांत राजपूत यांनी महाराष्ट्र गीत आणि मोर्चाचे गीत सादर करुन सर्वांमध्ये जोश भरला. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनंता मानकर, सहदेव लाड, मारोती मेढे, अक्षय पाटील, कृष्णा इंगळे, दत्तात्रय जेऊघाले, ज्ञानेश्वर खरात, श्याम अवथळे व विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले आदींनी देखील भाषण केले.

तुपकर हे राज्याचे नेतृत्व : गोसावी

रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे बोलणारे, भांडणारे आणि शेतकऱ्यांसाठी कोणतीच तमा न बाळगता लढणारे राज्याचे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही तोफ राज्यभर धडाडत असते, आमच्या कांदा उत्पादक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते धाऊन येतात, सरकारशी भांडून भाव मिळवून देतात त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील एल्गार मोर्चाला आपणही गेलेचे पाहीजे, या हक्काने मोर्चात आलो असे सांगत शेतकऱ्यांचे हे नेतृत्व सर्वांनी जपले पाहीजे, सांभाळले पाहीजे आणि या नेतृत्वाला बळ दिले पाहीजे, असे आवाहन प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले.

जोश, उत्साह अन् नारेबाजी

मोर्चाच्या गर्दीने सर्वच उच्चांक मोडले. जिल्हाभरातून आलेल्या उत्स्फूर्त शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साह, युवकांचा जोश अन् नारेबाजीने शहर दणाणले होते. हाती मागण्यांचे फलक, बैलगाडीत कापूस, सोयाबीन घेऊन, दफड्यांच्या निनादात, हलगीच्या तालावर प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा शहरातून फिरला मोर्चाचे जेव्हा सभेत रुपांतर झाले तेव्हा जागा अपुरी पडली. माणसांची गर्दी ओसंडून वाहत होती आणि त्याच तुलनेत महिलांचीही संख्या लक्षणीय होती.

शहरवासियांनी केले स्वागत

बळीराजाच्या फौजेचे शहरवासीयांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. आपल्या ताटात असणारा प्रत्येक कण अन कण शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण झाला आहे त्यामुळे या बळीराजाला आधार देणे आपली नैतिक जबाबदारी असल्याच्या भावनेतून शहरातील व्यापारी, व्यावसायीक आणि उद्योजकांनी मोर्चाच्या मार्गाने पाण्याचे, फळांचे स्टॉल लावले होते तर सभास्थळी देखील पाण्याचे वाटप करण्यात आले.

शिस्तबध्द मोर्चाने वेधले जिल्हावासीयांचे लक्ष

स्वखर्चाने जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोक दाखल झाले होते. युवकांचा प्रचंड उत्साह, शेतकऱ्यांसह वृद्धांसह, लहानग्या चिुकल्यांसह मायाभगीनींची लक्षणीय उपस्थिती होती. बैलगाडीत सोयाबीन-कापूस घेऊन सहभाग, हजारोंच्या हातात दिरुन आले रुम्हणे, दफड्यांचा निनाद आणि हलगीच्या तालावर शेतकऱ्यांच्या फौजेचे शिस्त पथसंचलन, सभास्थळी रविकांत तुपकर यांची आकर्षक रांगोळी, आणि सभेच्या स्थळापासून ते नजर जाईल तिथहपर्यंत दिसणारी गर्दी यामुळे हा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक ठरला.

मोठ्या देवीपासून मोर्चाला सुरुवात..

सोयाबीन – कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय्य हक्कासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रविवार, ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात शेतकऱ्यांचा अतिविराट असा एल्गार मोर्चा धडकला. चिखली मार्गावरील मोठ्या देवीपासून या मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाभरातून आलेले युवक, शेतकरी, मायमाऊल्या आणि शेतमजूर यांचा प्रचंड उत्साह, नारेबाजी आणि हातात रुम्हणे घेऊन हा मोर्चा मुख्य मार्गाने निघाला. एडेड चौक, तहसील चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक यामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टेटबँक चौकात पोहचल्यावर मोर्चाचे रुपांतर विराट सभेत झाले.